ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात केंद्रे कार्यान्वित

उष्माघात कक्ष www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत पोहाेचल्याने उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष कार्यान्वित केले आहेत.

सध्या शेतीची कामे सुरू असून, शेतमजूर आणि शेतकरी हे उन्हाची पर्वा न करता शेतात राबतात. त्यामुळे त्यांना उष्मघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते. अशा रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रांसह रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहेत.

उष्माघात होण्याच्या कारणांमध्ये शारीरिक श्रमाची, अंगमेहनतीची व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर कक्षात काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होण्याची शक्यता असते. बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, हृदयरोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार असलेल्या ज्येष्ठ व्यक्ती या उष्माघातात जोखमीच्या व्यक्ती असल्याने त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

उष्माघात केंद्रात या आहेत सुविधा

उष्माघात कक्षात रुग्णांसाठी खाट, कूलर, थंड पाण्याची व्यवस्था, पंखे यांसह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारांसह होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे.

हे करा तत्काळ उपाय

उष्माघात झाल्याचे जाणवल्यास रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे कपडे सैल करून शरीराचे तापमान कमी होईपर्यंत थंड पाण्याने पुसत राहावे, रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, रुग्णास थंड पाणी, जलसंजीवनी द्यावे, चहा किंवा कॉफी देऊ नये, रुग्णाच्या काखेखाली बर्फाचे तुकडे (आइस पॅक) ठेवावेत, कपाळावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवाव्यात, नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा, रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडल्यास १०८ रुग्णवाहिकेसाठी दूरध्वनी करावा.

हेही वाचा –

The post ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात केंद्रे कार्यान्वित appeared first on पुढारी.