ताडपत्री वाटप कार्यक्रमात आयुक्त गुंडे यांचे प्रतिपादन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील आदिम कातकरी लाभार्थ्यांच्या विकासासाठी वेळ पडल्यास चौकटीबाहेर जाऊन विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडामधून मदत करण्यासाठी आदिवासी विकास विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आयुक्त नयना गुंडे यांनी केले. बॉश इंडिया फाउंडेशन आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांच्या वतीने जिल्ह्यातील आदिम कातकरी कुटुंबीयांना ताडपत्री वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. (Tribal Development Department)

यावेळी प्रकल्प अधिकारी जितीन रेहमान, बॉश इंडिया फाउंडेशनचे वरिष्ठ सर्वसाधारण व्यवस्थापक श्रीकांत चव्हाण, सहायक प्रकल्प अधिकारी केतन पवार, कार्यालय अधीक्षक तुषार पाटील, लिपीक प्रणिता आंबरे, बॉशचे सहायक कार्यक्रम व्यवस्थापक स्नेहा जंगम आदी उपस्थित होते.

पुढे आयुक्त गुंडे यांनी, आदिवासी विकास विभागाचा (Tribal Development Department) आदिम कातकरी समाजासाठी असलेल्या आराखड्याव्यतिरिक्त बॉश कंपनीने हे काम केलेले आहे. यापुढेदेखील आदिवासी विकास विभाग कंपन्यांच्या सीएसआर फंडाचा वापर करून कातकरी समाजाच्या विकासासाठी काम करत राहील. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक आणि पेठ तालुक्यांमध्ये आदिवासी निरीक्षकांना कातकरी समाजाची लोक कुडाच्या घरात राहत असल्याचे निदर्शनास आले होते. तत्काळ त्यांना पंतप्रधान आवास योजना, आदिम आवास योजना आणि शबरी आवास योजनेंतर्गत घरकुल देण्याचे निर्देश देण्यात आले होते.

शबरी घरकुल योजनेंतर्गत लाभार्थी पात्र असून, घरकुल बांधण्यास काही महिन्यांचा विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्पुरती त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था म्हणून बॉश इंडिया फाउंडेशनने विलंब न करता १५० लाभार्थ्यांना ताडपत्री देण्याचे कबूल केले. त्यापैकी प्रातिनिधिक म्हणून आपण ३० लोकांना वाटप करत असल्याचे आयुक्त गुंडे यांनी सांगितले. यावेळी प्रकल्प अधिकारी जितीन रहमान यांनी प्रास्ताविकात पीएम जनमन कार्यक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली.

हेही वाचा:

The post ताडपत्री वाटप कार्यक्रमात आयुक्त गुंडे यांचे प्रतिपादन appeared first on पुढारी.