नाशिक-दिंडोरीतील पराभवाची कारणमिमांसा सुरू, बावनकुळेंनी मागविला अहवाल

चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दिग्गज उमेदवारांच्या लाजिरवाण्या पराभवाची कारणमिमांसा आता सुरू झाली आहे. २०१४ व २०१९च्या निवडणुकीत तब्बल अडीच लाखांची आघाडी मिळवून देणाऱ्या नाशिक शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातून महायुतीला यंदा अपेक्षित मताधिक्क्य का मिळाले नाही, यासंदर्भातील अहवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागविला आहे. उमेदवार निश्चितीपासून ते मतदानाच्या अंतिम क्षणांपर्यंत घडलेल्या सर्व घडामोडींची माहिती देणारा आणि पराभवाची कारणे स्पष्ट करणारा अहवाल प्रदेश कार्यालयाला पाठविण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली आहे.

नाशिक मतदारसंघात महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे तर दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोन्हीही उमेदवारांचा पराभव झाल्याने महायुतीची नाचक्की झाली आहे. विशेषत: नाशिक मतदारसंघ हा विजयासाठी महायुतीसाठी सर्वाधिक सुरक्षित मानला जात होता. नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात आहेत. नाशिक शहरातील पूर्व, पश्चिम व मध्य मतदारसंघांमध्ये भाजपचे तीन आमदार, तसेच देवळाली व सिन्नरमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार असूनही नाशिकमधून गोडसे यांना पराभव सहन करावा लागला. पूर्व व पश्चिम मतदारसंघातील अनुक्रमे १०,४०० व ३१,२१० मतांची आघाडी वगळता नाशिक मध्य, देवळाली, इगतपुरी व सिन्नरमध्ये गोडसे यांना मोठा फटका बसला. वाजे यांना या चारही मतदारसंघांमध्ये मताधिक्य लाभल्याने त्यांचे विजय सुकर बनला. विशेषत : नाशिक शहरात भाजपचे चार आमदार तसेच ६५ माजी नगरसेवक व मोठी यंत्रणा असूनही गत निवडणुकीइतके मताधिक्य मिळू शकले नाही. याची कारणमिमांसा आता पक्षाकडून केली जात आहे. भाजपचे आमदार तसेच नगरसेवकांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये कशी कामगिरी केली, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी सर्वप्रकाराचा समन्वय ठेवला का, बुथयंत्रणेपासून तर अन्य कामासाठी आवश्यक खर्च दिला का याची देखील उलटतपासणी आता केली जाणार आहे. त्यातच आता प्रदेश कार्यालयाकडून विचारणा झाल्यावर भाजपच्या नाशिक शहर कार्यालयाने तत्काळ अहवाल पाठवला आहे.

ॲन्टी इन्कंबन्सीचा फटका

सलग दहा वर्षे खासदार राहिलेले हेमंत गोडसे यांच्याविषयी मतदारसंघात ॲन्टीइन्कंबन्सी होती. त्यातच एका प्रकरणात त्यांची बदनामी होऊनही शिंदे गटाकडून त्यांच्या उमेदवारासाठी हट्ट केला गेला. भाजपकडे तुल्यबळ उमेदवार असूनही केवळ शिंदे गटाच्या हट्टाग्रहामुळे भाजपला निवडणूक लढविता आली नाही. उमेदवार निश्चितीत झालेल्या विलंबामुळेही प्रचारासाठी कमी वेळ मिळाला, आदी मुद्यांचा समावेश या अहवालात करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या पराभवाची कारणमिमांसा पक्षाकडून केली जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशांनुसार शहर भाजपकडून प्रदेश कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.

– प्रशांत जाधव, शहराध्यक्ष, भाजप.

हेही वाचा –