नाशिक : दीड लाखाची लाच घेताना शासकीय चालक गजाआड

लाचखोरांना अटक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शेतजमिनीच्या वादासंदर्भातील निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी लाचेची मागणी करून त्यासाठी शासकीय वाहनचालकाने लाच घेतल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभागीय कार्यालयातील चालक अनिल बाबूराव आगिवले (44) यास दीड लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. चालक आगिवले याने स्वत:साठी लाच घेतली की, त्याने इतरांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारली याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहेत.

तक्रारदाराने इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे येथील शेतजमीन विकत घेण्यासाठी विसार पावती नोटरी केली होती. या शेतजमिनीच्या संदर्भात तत्कालीन इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभागीय अधिकार्‍यांकडे वाद सुरू होता. या वादाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने दिल्याच्या मोबदल्यात संशयिताने तक्रारदाराकडे दोन लाखांची लाच मागितली. 24 फेब्रुवारी 2023 रोजी संशयिताने यापैकी पन्नास हजार रुपये घेतले. मात्र, उर्वरित पैशांसाठी त्याने तक्रारदाराकडे तगादा लावला. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या आदेशानुसार अपर अधीक्षक नारायण न्याहळदे आणि उपअधीक्षक नरेंद्र पवार यांनी सापळा रचण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, प्रकाश महाजन, नितीन कराड, प्रभाकर गवळी यांनी संशयितास लाचेचे दीड लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संशयितास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असून, विभागाने तपास सुरू केला आहे. नंदुरबारच्या कार्यकारी अभियंत्याची कसून चौकशी : उर्वरित बिल आणि नवीन कार्यारंभ आदेशाच्या मोबदल्यात लाच घेणार्‍या नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याची चौकशी सुरू केली आहे. 43 लाखांची मागणी करून साडेतीन लाख रुपये घेणार्‍या कार्यकारी अभियंता महेश प्रतापराव पाटील (51, रा. थत्तेनगर, गंगापूर रोड) असे कार्यकारी अभियंत्याचे नाव असून, तो चार दिवसांपासून पोलिस कोठडीत आहे. त्याच्या घरातून हस्तगत कागदपत्रांनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महत्वाचे पुरावे गोळा केल्याचे समोर येत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : दीड लाखाची लाच घेताना शासकीय चालक गजाआड appeared first on पुढारी.