नाशिक : ‘पाणीपुरवठा’च्या प्रशासकीय खर्चाला मान्यता; महासभेचा मिळाला हिरवा कंदील

पाणी योजना www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या ३५० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा सुधारित प्रस्तावाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या तत्त्वत: मान्यतेनंतर मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत प्रशासकीय खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या योजनेमुळे महापालिकेवर १७५ कोटींचा बोजा पडणार असून, हा निधी उभा करण्याची मोठी कसरत करावी लागणार आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०१८ मध्ये नाशिकमधील जलवाहिन्यांसाठी अमृत १ अभियानातून निधी देण्याची ग्वाही दिली. त्यानुसार मनपा पाणीपुरवठा विभागाने जुन्या जलवाहिन्या बदलणे, नववसाहतींत जलवाहिन्या टाकणे, जलकुंभांची निर्मिती, जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविणे आदी कामांचा समावेश असलेला २२६ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या पडताळणीनंतर प्रस्तावाला तांत्रिक मान्यतादेखील मिळाली होती. मात्र, हा प्रस्ताव केंद्राकडे पोहोचेपर्यंत अमृत १ अभियानातील महाराष्ट्राच्या हिश्श्याचा निधी संपुष्टात आल्याने प्रस्ताव धूळ खात पडून होता.

मनपाचे तत्कालीन प्रशासक रमेश पवार व विद्यमान आयुक्त तथा प्रशासक डॉ. पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा विभागाने ३५० कोटींचा सुधारित प्रस्ताव राज्य शासनास सादर केला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तांत्रिक तपासणीनंतर केंद्र व राज्य सरकारने अमृत २ अंतर्गत या योजनेला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यानुसार केंद्र सरकार व राज्य सरकारचा प्रत्येकी २५ टक्के हिस्सा, तर महापालिकेचा ५० टक्के हिस्सा असणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी महापालिकेला १७५ कोटींचा निधी उभा करावा लागणार आहे. दरम्यान, महासभेचे मंजुरीनंतर सल्लागार संस्थेची नियुक्ती केली जाणार असून, त्यानंतर डीपीआर केंद्र व राज्य सरकारला सादर केल्यानंतर निधी मिळणार असल्याचे मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सुधारित प्रस्तावातील कामे

सुधारित प्रस्तावानुसार शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून सातपूर, नवीन नाशिक व नाशिक पश्चिम विभागात पाणीपुरवठा करणाऱ्या २२ किमी लांबीच्या ५०० ते १२०० मिमी. व्यासाच्या सिमेंटच्या जुन्या जलवाहिन्या बदलून ७०० ते १२०० मिमी व्यासाच्या नवीन लोखंडी जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. गावठाणातील जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन १०० कि.मी. लांबीच्या जलवाहिन्या टाकल्या जातील. तसेच नवविकसित परिसरात ८५ किमी लांबीच्या नवीन जलवाहिन्या प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : 'पाणीपुरवठा'च्या प्रशासकीय खर्चाला मान्यता; महासभेचा मिळाला हिरवा कंदील appeared first on पुढारी.