नाशिक : पार्किंगची जबाबदारी आता हॉटेलचालकांवरच!

पार्किंग,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील पार्किंगचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेलसमोर रस्त्यांवर अस्ताव्यस्त उभी असलेली ग्राहकांची वाहने वाहतूक कोंडीचे कारण ठरत असल्याने आता हॉटेलचालकांना वाहन पार्किंगची जबाबदारी उचलावी लागणार आहे. महापालिकेच्या जागेवर वाहने उभी करायची असेल तर त्यासाठी एका वाहनामागे पाच ते दहा रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या माध्यमातून शहरातील अस्ताव्यस्त पार्किंगला शिस्त लागण्याबरोबरच महापालिकेच्या महसुलातही वाढ होईल, अशी अपेक्षा आयुक्त डॉ. करंजकर यांनी व्यक्त केली आहे.

शहरात वाहन पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना वाहनतळांची संख्या मात्र पर्याप्त नसल्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस अवघड बनत चालला आहे. यातून शहरात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, वाहनधारकांना मनस्ताप, हवा व ध्वनिप्रदूषण, वेळेचा अपव्यय, वाहतूक पोलिसांवर येणारा ताण या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी महापालिका आयुक्तांनी ‘मिशन पार्किंग’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत शहरात पार्किंग व्यवस्थेबरोबरच महापालिकेसाठी उत्पन्नाचा नवीन स्त्रोत निर्माण केला जाणार आहे. शहरातील अनेक हॉटेल्सच्या समोर रस्त्यावरच ग्राहकांकडून वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. वाहतुकीचे नियोजन करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची असली तरी रस्त्यावर वाहने उभी करून हॉटेल ग्राहकांकडून महापालिकेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर केला जात असल्याने हॉटेल ग्राहकांनी रस्त्यावर वाहने उभी केल्यास त्यावरील दंडात्मक शुल्क हॉटेलचालकांकडून वसूल करणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.

शिवाजी स्टेडिअमवर ‘पे अॅण्ड पार्क’

शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा, एम. जी. रोड, सीबीएस, शालिमार, मेनरोड परिसरात वाहन पार्किंगसाठी पर्याप्त जागा नसल्यामुळे वाहनधारकांचे हाल होतात. वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमच्या जागेवर पे अॅण्ड पार्क उभारण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला जाणार आहे. एम. जी. रोडवरील स्टेडियम कॉम्प्लेक्समधील इमारतींमधील वाहनतळांचीही तपासणी करून तेथेही पार्किंगची व्यवस्था करण्याची नियोजन आहे.

सायकल ट्रॅकवर पार्किंग

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यान उभारलेल्या स्मार्ट रोडवर सायकल ट्रॅक तयार केला आहे. मात्र, या ट्रॅकचा सायकलींसाठी वापर होत नसल्यामुळे ही जागा वाहन पार्किंगसाठी वापरण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. समायोजित आरक्षण (एआर)अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या मुंबई नाका, कॅनडा कॉर्नर व पंचवटी भागातील इमारतींमधील पार्किंगविषयी तक्रारी असल्याने या इमारतींची पाहणी केली जाणार आहे.

हॉटेलांसमोर ग्राहकांकडून रस्त्यांवर अस्ताव्यस्त उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्यामुळे अशा वाहनांवर दंडात्मक कर आकारणी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

– डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका

हेही वाचा :

The post नाशिक : पार्किंगची जबाबदारी आता हॉटेलचालकांवरच! appeared first on पुढारी.