धुळे : विवाहितेची गळा चिरून हत्या करणाऱ्या युवकाला जन्मठेपेची शिक्षा

धुळे : पुढारी वृत्तसेवा

विवाहितेला लॉजवर बोलवून तिचा गळा चिरून हत्या करणाऱ्या संशयित आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सत्र न्यायाधीश ए एच सय्यद यांनी सुनावली आहे. घटना घडण्यापूर्वी मयत आणि आरोपी यांना प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार फितूर झालेला असताना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी मोबाईलचे विश्लेषण हा महत्त्वाचा पुरावा न्यायालयात सिद्ध केला. या तांत्रिक पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. खून करण्यापूर्वी आरोपीने मयतासोबत काढलेला सेल्फी आणि खून केल्यानंतर मृतदेहाचा काढलेला फोटो हा पुरावा या खटल्यामध्ये पुराव्यांमधे महत्त्वपूर्ण मुद्दा ठरला आहे

शिरपूर येथील वडगल्ली मध्ये राहणाऱ्या रेणुका धनगर यांचा विवाह दि. 23 मार्च 2019 रोजी झाला. दुसऱ्या दिवशी त्या त्यांच्या माहेरी जातोडा येथे आल्यानंतर दि. 25 मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास घरून गावातच चहा पिण्यासाठी कारण सांगून रेणुका घरातून बाहेर पडली. मात्र जाताना तिचा मोबाईल घरीच विसरली. या दरम्यान रेणुका ही नरेंद्र एकनाथ भदाणे यांच्या समवेत दुचाकीने शिरपूर येथील संगीता लॉज येथे आली. या लॉजमध्ये तिचा नरेंद्र भदाणे यांनी धारदार चाकूने गळा चिरून खून केला. यावेळी मयत रेणुकाच्या भ्रमणध्वनीवर त्याने संपर्क करून तिच्या आईला स्वत:चे नाव सांगून रेणुकाचा खून केल्याची माहिती देखील दिली. त्यामुळे विवाहीतेचे नातेवाईक तत्काळ संगीता लॉज येथे पोहोचले. यावेळी खोली नंबर 109 मध्ये रेणुका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. त्यामुळे शिरपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास केला.

हेही वाचा:

The post धुळे : विवाहितेची गळा चिरून हत्या करणाऱ्या युवकाला जन्मठेपेची शिक्षा appeared first on पुढारी.