नाशिक : प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरी

चोरी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
येथील सिन्नर बसस्थानकात दोन प्रवाशांच्या बॅगेमधून मोबाईल, दागिने व रोकड चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली.

सुभाष रामचंद्र ढाकणे (40, रा. साईबाबा नगर, सिन्नर) हे गावी जाण्यासाठी दुपारी बसस्थानकात आले होते. यावेळी ते येथील बाकड्यावर बॅग ठेवून लघुशंका करण्यासाठी स्वच्छतागृहात गेले असता अज्ञात चोरट्याने संधी साधत त्यांच्या बॅगेमधील विवो कंपनीचा मोबाइल, काळ्या धाग्यात ओवलेले ओमपान व काही रोकड घेऊन लंपास झाला. ढाकणे लघुशंका करून पुन्हा बॅगेजवळ आले असता त्यांना बॅगेतून मोबाइल व रोकड चोरीला गेल्याचे दिसून आले. आसपास विचारपूस करूनही काही तपास न लागल्याने त्यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात येत अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सिन्नर बसस्थानकामध्ये बसमध्ये चढताना वृद्ध दाम्पत्याचे पाकीट पळवल्याची घटना नुकतीच घडली. मुकर्रम बोहरी (65) व शिरीन बोहरी (57) हे नाशिक येथील गोविंदनगर भागात राहणारे दाम्पत्य कामानिमित्त सिन्नर येथे आले होते. काम झाल्यावर नाशिकला जाण्यासाठी बसस्थानकावर आले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. प्लॅटफॉर्मवर बस लागली असता हे दाम्पत्य बसमध्ये चढण्यासाठी गर्दीत गेले असता अज्ञात चोरट्याने बोहरी यांच्या बगलेत अडकवलेल्या चेनबंद बॅगेतून पैशांचे पाकीट पळवून नेले. नाशिकला घरी गेल्यानंतर त्यांना पाकीट चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. पाकिटामध्ये साडेसहा हजारांची रोकड, पॅनकार्ड, सोन्याचे पँडेंट, बँक लॉकरची चावी या वस्तू होत्या. बसस्थानकात दिवसेंदिवस महिलांचे सोन्याचे दागिने, पैसे, पाकीट चोरीला जाण्याचे प्रकार वाढत असून, सिन्नर पोलिसांचे या घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मागील आठवडाभरात एका वृद्धेचे नऊ तोळ्यांचे मंगळसूत्र, तर एका महिलेच्या बॅगेतून साडेचार तोळ्यांचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता बसने प्रवास करण्यास नागरिक धजावत नसल्याचे दिसून येत आहे.

वृद्धाच्या पिशवीतून सोन्याची पोत लांबविली
दुसर्‍या घटनेत दापूर येथील खंडू रघुनाथ आव्हाड (79) हे वृद्ध बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्याकडील पिशवीतून एक तोळ्याची पोत चोरून पोबारा केला. काही वेळानंतर त्यांच्याही चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनीही तत्काळ सिन्नर पोलिस ठाण्यात येत अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिस नाईक चेतन मोरे व हवालदार पवार पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरी appeared first on पुढारी.