नाशिक : भुजबळांच्या बालेकिल्ल्यात भुजबळांचाच निषेध

Minister Chhagan Bhujbal criticized sharad pawar in pune

येवला; पुढारी वृत्तसेवा : भूजबळ यांचा बालेकिल्ला असणाऱ्या येवला मतदारसंघातच भुजबळांविरुद्ध काळे झेंडे व काळ्याफिती लावून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

बीडमध्ये अजित दादा पवार गटाच्या झालेल्या सभेमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांविरुद्ध वक्तव्य केले होते. त्यांच्याविरोधात येवल्यामध्ये शरद पवार गटाकडून ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शरद पवारांबाबत भुजबळांकडून भाषणामध्ये झालेल्या बेताल वक्तव्य प्रकरणी बोलताना माणिकराव शिंदे म्हणाले की, वीस वर्षांपूर्वी तुमची अवस्था मी जवळून बघितली आहे. त्यावेळी काय काय झाले? काय काय चालले होते? हे सगळे मला माहित आहे असे बोलत अॅड. माणिकराव शिंदे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, एकीकडे विठ्ठल विठ्ठल म्हणून बोलायचे आणि दुसरीकडे दुखवायचे हे बरोबर नसून हा प्रकार निषेधार्थ आहे. भुजबळ यांना येवल्यातील शरद पवार प्रेमी जनतेने राजकीय पुनर्जन्म दिला. अशी मते शरद पवारांच्या समर्थकांना भुजबळांनी कालच्या सभेत आपल्या ज्येष्ठ नेत्यांविरुद्ध बोलून दुखावल्याची भावना यावेळी कार्यकर्ते व्यक्त करीत होते.

यावेळी शरद पवार गटाकडून काळे झेंडे व काळ्याफिती लावून भुजबळांचा निषेध घोषणा देत महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार अशा घोषणा देत तहसील कार्यालयाचे परिसर दणाणून सोडला होता. यावेळी येवला तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट शाहू शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान येवला मतदार संघातून मोठ्या संख्येने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते मंगळवारी मुंबई येथे शरद पवारांच्या भेटीसाठी जाणार असल्याचेही ठरले.

The post नाशिक : भुजबळांच्या बालेकिल्ल्यात भुजबळांचाच निषेध appeared first on पुढारी.