
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
काझी गढीवर अत्यंत धोकादायक स्थितीत राहणाऱ्या पन्नास कुटुंबीयांचे स्थलांतर करून त्यांना काही काळ निवारा उपलब्ध करून देण्याचा आव आणणाऱ्या महापालिका प्रशासनाने ऐनवेळी हात झटकल्याने, हे कुटुंब आपापल्या नातेवाइकांकडे वास्तव्यास गेले आहेत. सुरुवातीला संत गाडगेबाबा ट्रस्टच्या धर्मशाळेत या कुटुंबांची व्यवस्था करणार असल्याचे मनपा प्रशासनाने ठरविले होते. परंतु या ठिकाणी खोल्याच उपलब्ध नसल्याचे सांगितले गेल्याने, या कुटुंबीयांना आपल्या नातेवाइकांकडे निवारा शोधावा लागला आहे.
काझी गढीच्या काठावर अत्यंत धोकादायक स्थितीत राहात असलेल्या ५० कुटुंबीयांचे स्थलांतर तत्काळ करण्याची गरज असल्याचा अहवाल मनपाच्या पाहणी पथकाने प्रशासनास सादर केला होता. त्यानुसार आमदार देवयानी फरांदे तसेच तत्कालीन प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानायत यांनी बैठक घेत, या कुटुंबीयांचे स्थलांतर संत गाडगेबाबा ट्रस्टच्या धर्मशाळेत करावे, अशा सूचना दिल्या होत्या. या कुटुंबीयांनीही धर्मशाळेत जाण्याबाबत समर्थता दर्शविली होती. परंतु ऐनवेळी धर्मशाळेत खोल्या रिक्त नसल्याचा सांगावा मनपा प्रशासनाने या कुटुंबीयांना धाडल्याने, नाइलाजास्तव या कुटुंबीयांना आपल्या नातेवाइकांकडे निवारा शोधावा लागला. वास्तविक, आमदार फरांदे आणि प्रभारी आयुक्त बानायत यांनी रहिवाशांना धर्मशाळेचा प्रस्ताव देताना, खोल्यांच्या उपलब्धतेची माहिती घेणे अपेक्षित होते. शिवाय खोल्या उपलब्ध नसल्यास दुसरा पर्याय काय? यावर रहिवाशांशी चर्चा करणे गरजेचे होते. मात्र, याबाबतची कोणतीही माहिती न घेता, बैठकांचा सोपस्कार पार पाडण्यातच प्रशासनाने धन्यता मानल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, रहिवाशांचे स्थलांतर धर्मशाळेत करण्याबरोबरच त्यांना जीवनोपयोगी वस्तू उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची होती. मात्र, बैठकीपुरतीच रहिवाशांची बोळवण केल्याची चर्चा आता महापालिका वर्तुळात रंगत आहे.
शाळांमध्ये वास्तव्यास नकार
संत गाडगेबाबा ट्रस्टच्या धर्मशाळेत खोल्या उपलब्ध नसल्याचे कळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने परिसरातील शाळांचा पर्याय रहिवाशांसमाेर ठेवला होता. मात्र, त्यास रहिवाशांनी नकार दिला. धर्मशाळेत खोल्यांची उपलब्धता आहे की नाही, याची माहिती अगोदरच मनपा प्रशासनाने का घेतली नाही? असा सवाल आता रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा :
- सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणे निम्म्यावर
- Kolhapur Rain | राधानगरी धरणाचा ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला
- चिंतेची बाब ! राज्याच्या बहुतांश भागांतील भूजल पातळी दोन ते तीन मीटरने खालावली
The post नाशिक| मनपाने झटकले हात : काझी गढीवरील रहिवासी नातेवाइकांच्या घरी appeared first on पुढारी.