नाशिक : मागेल त्याला फळबाग, ठिबक अन् शेडनेट

फळबागा www.pudhari.news

नाशिक : वैभव कातकाडे
राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मागेल त्याला शेततळे या योजनेनंतर आता कृषी विभागाने मागेल त्याला फळबाग, ठिबक-तुषार, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्रे आणि कॉटन श्रेडर या योजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे लागणार असून, पात्र शेतकर्‍यांना अनुदानवाटप होणार आहे. या ऑनलाइन प्रणालीमुळे शेतकर्‍यांना कमी वेळेत लाभ होणार आहेत.

शेतकर्‍यांना विविध शेतीपूरक योजनांसाठी 2023-24 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सूचना योजना राबविण्यासाठी 350 कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचनासाठी 10 कोटी रुपये, तर वैयक्तिक शेततळ्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात देण्यात आला आहे. मंजूर लाभार्थ्यांना या निधीचे वितरण महाडीबीटीमार्फत होणार आहे. सध्या सुरू असलेल्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून मागेल त्याला फळबाग देण्यात येईल. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सूक्ष्म सिंचन, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून शेततळे, राष्ट्रीय कृषी विकास एकात्मिक फलोत्पादन, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन, बिरसा मुंडा कृषी क्रांती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेततळ्याचे अस्तरीकरण केले जाणार आहे. याच योजनांमधून मागेल त्याला शेडनेट व हरितगृहही मिळणार आहे. कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र आणि कॉटन श्रेडर हे साहित्य मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षासाठी ही योजना राबविली जाणार असून या बदलाचे शेतकर्‍यांकडून स्वागत होत आहे.

शेतकर्‍यांकडून योजनांचे स्वागत
शेतकर्‍यांना आवश्यक घटकांची मागणी केल्यावर तातडीने उपलब्धता झाल्यास नक्कीच शेती उत्पादनात वाढीसाठी मोठ्या प्रमाणात फायदा होतो. त्यामुळे शासनाने मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार करण्याची घोषणा केली होती. त्यालाच अनुसरून आता मागेल त्याला फळबाग, ठिबक व तुषार सिंचन, शेडनेट, हरितगृह पेरणी यंत्रे शेततळ्याचे अस्तरीकरण हे साहित्य उपलब्ध होणार असल्याने याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मागेल त्याला फळबाग, ठिबक अन् शेडनेट appeared first on पुढारी.