नंदुरबार : विजय चौधरी यांची भाजपा प्रदेश महामंत्रीपदी निवड

नंदुरबार : भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केलेल्या व्यापक कार्याची दखल घेत केंद्रीय नेतृत्वाने सहमती दिल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी विजय चौधरी यांची निवड केल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. नंदुरबार जिल्हा भाजपाच्या इतिहासात प्रथमच प्रदेश महामंत्रीपदासारखे उच्च महत्वाचे पद नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्याला लाभले आहे. यामुळे जिल्हाभरातील कार्यकत्यांकडून विशेष जल्लोष केला जात आहे.

लवकरच विजय चौधरी यांची विधानपरिषदेच्या आमदारपदासाठी देखील वर्णी लागू शकते; अशी भाजपातील मान्यवरांच्या गोटातील चर्चा आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय नेते तथा देशाचे गृहमंत्री अमीत शहा व केंद्रीय संघटन सरचिटणीस संतोष यांच्या मान्यतेनुसार भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांना मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालयात या पदाचे नियुक्ती पत्र देत जबाबदारी सोपविली. यासोबतच भारतीय जनता पार्टीचे उत्तर महाराष्ट्रातील संघटन करण्याची जबाबदारी असल्याचा उल्लेख त्यांनी याप्रसंगी केला. त्त्या प्रसंगी संघटन मंत्री विक्रांत पाटील संघटन मंत्री माधवी नाईक प्रदेश प्रवक्ते किशोर उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, नंदुरबार शहर येथे माजी आमदार शिरीषदादा चौधरी व प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्र कुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील जुनी नगरपालिका चौक येथे फटाके फोडत व पेढे भरवीत जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष संगीता सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष संजय साठे, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, नगरसेवक चारुदत्त कळवणकर, आनंद माळी, लक्ष्मण माळी, प्रशांत चौधरी आदींचा यात समावेश होता.

विजय चौधरी यांच्या कार्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी:

विजय चौधरी हे २०१४ साली भारतीय जनता पार्टीत आले. महत्वाची भूमिका निभावत नंदुरबार जिल्हा भाजपाला मजबूत करण्यास त्यांनी प्रारंभ केला. दरम्यान पक्षाकडून विजय चौधरी यांना भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली तेव्हा सातत्याने राज्यभर दौरे करीत त्यांनी ओबीसी संघटन अधिक मजबूत करून दाखवले. २०१९ साली नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदाची धुरा पक्षाने सोपविली. राज्यात भाजपाची सत्ता नसतांनाच्या त्या काळात नंदुरबार जिल्ह्यातील विविध पक्षातील मान्यवरांना भाजपात आणण्यासाठी महत्वाची भूमिका विजय चौधरींनी बजावली. त्यामुळे चौधरी यांच्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्याची व्यापकता वाढत जाऊन भाजपाच्या इतिहासात नंदुरबार भाजपाचे संघटन प्रथमच मजबूत आणि व्यापक बनले. आता सध्या ते गुजरात राज्यातील निवडणुकीतसुध्दा प्रभारी बनून कामगिरी बजावत आहेत. एकंदरीत या सर्व कार्याची दखल घेत केंद्रीय नेतृत्वाने विजय चौधरी यांना प्रदेश महामंत्रीपदाची महत्वाची जबाबदारी सोपविली आहे.

हेही वाचा :

The post नंदुरबार : विजय चौधरी यांची भाजपा प्रदेश महामंत्रीपदी निवड appeared first on पुढारी.