नाशिक : माजी आमदार जे. पी. गावित यांचा बंडाचा झेंडा, निवडणूक लढण्यावर ठाम

पांडू गावित - जे. पी. गावित pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. गावितांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी (दि.२०) थेट दिंडोरी गाठत गावितांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावित उमेदवारीवर ठाम असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचे गणित बिघडणार आहेत. माजी आमदार गावित यांनी शुक्रवारी (दि.१९) कार्यकर्त्यांचा मेळावा घेत दिंडोरीमधून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले. या मेळाव्यातून गावित यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. दिंडोरीतून महाविकास आघाडीने भास्कर भगरे यांच्या उमेदवारीचा पुनर्विचार करावा असा थेट इशारा दिला. गावितांच्या या बंडामुळे खा. शरद पवार यांच्यासमोर एक प्रकारे आव्हान उभे ठाकले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी ओझर येथील एका फार्म हाऊसवर गावित यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीत पाटील यांनी विधानसभेत माकपला चार जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु, गावितांकडून हा प्रस्ताव साफ धुडकावण्यात आला आहे. त्यामुळे दिंडोरीत महाविकास आघाडीने विजयासाठी आखलेल्या मनसुब्यांना सुरुंग लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर होत पहिला असलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने दिंडोरीची जागा प्रतिष्ठेची केली आहे. खुद्द खा. शरद पवार यांनी भगरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करताना महाविकास आघाडीची जागा निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या. माकपनेही आघाडीचा धर्म पाळताना मविआला मदतीचे आश्वासन दिले होते. पण, गावित यांची निवडणूक लढण्याची मनीषा काही लपून राहिली नव्हती. शुक्रवारच्या (दि.१९) मेळाव्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे उमेदवारी घोषणेपासून ते प्रचारात आघाडी घेतलेल्या भगरे यांचा मार्ग अधिक खडतर बनणार आहे.

मविआसाठी धोक्याची घंटा : २०१९ च्या निवडणुकीत जे. पी. गावित यांनी दिंडोरीतुन नशिब आजमावले. त्यावेळी त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची १ लाख ९ हजार ५७० मते घेतली. गावितांनी घेतलेल्या मतांमुळे तत्कालीन महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नुकसान झाले होते. तर खा. डॉ. भारती पवार यांच्या विजयाचा मार्ग सुकर बनला. यंदा माकपाने मविआला मदत करण्याची भूमिका प्रथमतः घेतली होती. पण, गावितांनी पुन्हा एकदा निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मविआसाठी ही धोक्याची घंटा आहे.

पाच वर्षांनंतर माझी आठवण झाली का? : हरिश्चंद्र चव्हाण गेल्या पाच वर्षांत केंद्रीय राज्यमंत्र्यांना माझ्यासह जनतेचा, कार्यकर्त्यांचा विसर पडला होता काय ? पाच वर्षांनंतर आता माझी आठवण आली का? असा हल्लाबोल माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केला. दरम्यान, आपण दिंडोरीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना हरिश्चंद्र चव्हाण यांचा कोणताही पाठिंबा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारती पवार यांच्या प्रचार दौऱ्यात आपण सहभागी होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल करीत असून पत्रकांवर आपली नावे टाकली जात आहेत. केले. काही ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारती पवार यांच्या प्रचार दौऱ्यात आपण सहभागी होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल करीत असून पत्रकांवर आपली नावे टाकली जात आहेत. मात्र, आपला भाजप उमेदवाराशी कोणताही संबंध नसल्याचे माजी खासदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

दिंडोरीची जागा लढण्याबाबत पक्षाने आपल्याला हिरवा कंदील दिला असून, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेत विधानसभेत ४ जागा देण्याचा प्रस्ताव दिला. पण, विधानसभेपर्यंत युती व आघाडीचे वातावरण टिकणार नाही. त्यामुळे आघाडीने भगरे यांच्या उमेदवारीचा पुनर्विचार करावा. माकपने आपल्याला उमेदवारी दिली असून, पक्षाने घेतलेल्या निर्णयात कोठेही बदल होत नसतो. – जे. पी. गावित, माजी आमदार, माकप.

हेही वाचा: