नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहर व परिसरात घरफोडीचे सत्र सुरूच असून, दररोज शहरातील कुठल्या तरी भागात अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत. नाशिक रोड परिसरात एकाच दिवशी तीन घरफोड्यांच्या घटना समोर आल्या असून, तिन्ही घटनांमध्ये चोरटे हात साफ करून पसार झाले आहेत. त्यामुळे या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
गुरुवारी (दि. २३) या घडलेल्या या तिन्ही प्रकरणांत चोरट्यांनी बंद घर असल्याचा फायदा घेऊन घरातील ऐवज लंपास केला. तिन्ही प्रकरणांत चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत एकच असल्यामुळे, या तिन्ही प्रकरणांतील चोरटे एकच असल्याचा पोलिसांना संशय आहे. पहिल्या घटनेत विठाबाई बाजीराव वलवे (५०, रा. गंगापाडळी, लाखलगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि. २३) सायंकाळी ७ च्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरातील दोन लाख ५५ हजार रुपये किमतीचे दागिने व रोकड लंपास केली. दुसऱ्या घटनेत शांताराम विष्णू मानकर (४८, रा. चाडेगाव फाटा, सामनगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी सकाळी ११.१५ ते दुपारी १ च्या सुमारास त्यांच्या चेहेडी फाटा येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख १२ हजार 300 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली. तर तिसऱ्या घटनेत विजय बाबूराव भामरे (४३, रा. कौशल्या निवास, विजयनगर चेहेडी पंपिंग) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी रात्री ११.३० ते सकाळी ६.३०च्या दरम्यान, चोरट्यांनी कशाच्या तरी साहाय्याने घराचे कुलूप तोडून एक लाख २१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली.
या तिन्ही प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, शहर व परिसरात घरफोडीच्या घटना सातत्याने समोर येत असल्यामुळे, पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
——-०——–