नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आता चढू लागला असून, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या मैदानात उतरले आहेत. बुधवारी (दि. ८) मुख्यमंत्री शिंदे नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीच्या माध्यमातून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहणाबरोबरच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेची मरगळ झटकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला जाणार आहे.
उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता खऱ्या अर्थाने प्रचारयुद्ध सुरू झाले आहे. निवडणुकीचे रण आता चांगलेच तापले आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीची उमेदवारी जाहीर करण्यात विलंब झाला. त्याचा परिणाम महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारावर झाला असून, प्रचारासाठी आता अवघे ११ दिवस उरले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील सिन्नर, इगतपुरी, देवळाली, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम व नाशिक मध्य या सहा मतदारसंघांत प्रचार करताना उमेदवाराची दमछाक होणार आहे. त्यातच मोठ्या संघर्षातून महायुतीची नाशिकची जागा शिंदे गटाला मिळाली असल्याने महायुतीतील घटक पक्षांमधील नाराजीचा सूर कायम आहे. विशेषत: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळू न शकल्याने ओबीसी समाज कमालीचा नाराज आहे. त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याचा धोका आहे. भाजपतही अंतर्गत धुसफूस आहे. शिंदे गटातही काही प्रमाणात नाराजी आहेच. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याण, ठाण्यानंतर नाशिकच्या जागेकडे लक्ष केंद्रित केले आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना या निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक साधण्याची संधी आहे. सलक दोन वेळा खासदार राहिलेले गोडसे तिसऱ्यांदा निवडून आल्यास केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी त्यांना लागू शकते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी गोडसे यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
मुख्यमंत्री काय बाेलणार याकडे लक्ष
मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत दुपारी साडेबाराला गोविंदनगर येथील मनोहर गार्डन येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. यात मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगर येथून हेलिकॉप्टरने ते पोलिस परेड ग्राउंडवर येतील. तेथून ते पक्षाच्या बैठकीकरिता रवाना होतील. त्यानंतर संगमनेरकडे मुख्यमंत्री रवाना होणार आहेत.
हेही वाचा –