नाशिक : विवाहितेचा छळ करणाऱ्या सासूला कारावास

न्यायालय www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विवाहानंतर विवाहितेस शारीरिक व मानसिक त्रास देत छळ करणाऱ्या सासूला जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. गयाबाई नामदेव शिरसाठ (५०, रा. सिन्नर) असे सासूचे नाव आहे.

माधुरी हिचा विवाह सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विकास नामदेव शिरसाठ याच्याशी मार्च २०१८ मध्ये झाला होता. विवाहाच्या चार महिन्यांनंतर माधुरीचा सासरच्यांकडून छळ सुरू झाला. सासू गयाबाईने माधुरीला खुरप्याने मारहाण करून जखमी केले होते. माधुरीचा संसार सुखाचा होईल, या आशेवर तिच्या आई-वडिलांनी माधुरीची समजूत घालून नांदण्यास सांगितले तसेच सासूविरोधात तक्रार केली नव्हती. मात्र त्यानंतरही माधुरीचा छळ सुरूच होता. या छळाला कंटाळून माधुरीने दि. २९ ऑगस्ट २०२० रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात माधुरीचा पती, दीर आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

सरकारी पक्षातर्फे ॲड. रेश्मा जाधव यांनी युक्तिवाद केला. त्यांनी या खटल्यात साक्षीदार तपासले. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायाधीश मृदुला भाटिया यांनी माधुरीची सासू गयाबाईला माधुरीचा छळ केल्याबद्दल सहा महिने कारावास व एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. माधुरीचा पती, सासरे व दीर यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.

हेही वाचा : 

The post नाशिक : विवाहितेचा छळ करणाऱ्या सासूला कारावास appeared first on पुढारी.