नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रंगणार चढाओढ

शिक्षक निवडणूक pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-लोकसभा निवडणूकीची रंगत सुरू असतानाच विधानपरिषदेच्या शिक्षक आमदार निवडणुकीची अधिसूचना लागल्याने इच्छूकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी (दि. ३१) पासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाचा विस्तार पाच जिल्हे आणि ५४ तालुक्यांचा आहे. त्यामुळे प्रचार यंत्रणा सक्रिय करणे, नियोजन करताना उमेदवारांची परीक्षाच होणार आहे. त्यातच आता उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसते.

यामध्ये विद्यमान आमदार दराडेंसह मविप्र संचालक संदीप गुळवे, अहमदनगरमधील प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे, भाजपचे विवेक कोल्हे, टीडीएफचे भाऊसाहेब कचरे नाशिकमधून आर. डी. निकम, ॲड. महेंद्र भावसार, प्रा. प्रकाश सोनवणे, धुळ्यामधून गेल्या वेळी निवडणूक लढविलेले संदीप बेडसे आदी इच्छूक असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार हे मुंबईतून ठरणार आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस, कोकण विभाग पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे, नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे व मुंबई विभागाचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा कार्यकाळ ७ जुलै २०२४ ला संपत आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने दहा दिवसांपूर्वी शिक्षक मतदारसंघाचा कार्यक्रम पुढे ढकलला होता. आता हा कार्यक्रम जाहीर झाला असून, शाळा सुरू झाल्यावर २६ जूनला निवडणूक होणार असल्याने उमेदवारांना प्रचाराला सोपे वातावरण तयार झाले आहे.

इच्छूकांची बलस्थाने

  • किशोर दराडे : विद्यमान आमदार, आमदार झाल्यापासून शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी कार्यरत, व्यवस्थापनात आघाडी.
  • संदीप गुळवे : उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था मविप्रचे संचालकपद, राजकीय पार्श्वभूमी असल्याने अनुभव, शिक्षकांमध्ये चांगले नाव.
  • डॉ. राजेंद्र विखे : प्रवरानगर अभिमत विद्यापीठाचे कुलपती असल्याने शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास तत्पर, राजकीय कौटूंबिक पार्श्वभूमी.
  • अपूर्व हिरे : एकदा आमदारकीचा अनुभव, संपूर्ण मतदारसंघात ओळख, महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक.
  • विवेक कोल्हे : कोपरगाव येथील संजीवनी ग्रुपचे संचालक, राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी, पाचही जिल्ह्यात शिक्षण संस्थांमध्ये ओळख.
  • भाऊसाहेब कचरे : शिक्षक लोकशाही आघाडीचा पूर्ण पाठींबा.
  • आर. डी. निकम : शिक्षकांच्या प्रश्नांसाठी तत्पर अशी ओळख.
  • संदीप बेडसे : गेल्या निवडणुकीचा अनुभव, राजकीय संबंध सलोख्याचे.
  • प्रकाश सोनवणे : शिक्षकांमधील ओळखीचा चेहरा, निवडणुकीचा अनुभव.