नाशिक : स्टेट बँकेची ८६ लाखांची फसवणूक

बँकेची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील बांधकाम व्यावसायिकाच्या आधारकार्डवर स्वत:चा फाेटाे लावून स्टेट बँकेत बनावट कागदपत्रे सादर करून ८६ लाख रुपयांचे गृह कर्ज मिळवत फसवणूक करणाऱ्या संशयित विवेक उगले याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. यासंदर्भात बँकेच्या वतीने भद्रकाली पाेलिस ठाण्यात विवेकसह सात जणांविरोधात फसवणूक, अपहाराची फिर्याद दाखल केली आहे.

बँकेतर्फे प्रकाश सावंत (४८, रा. टागोरनगर) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, संशयित विवेक उगले, अजय संजय आठवले, रोशनी सागर जयस्वार, संतोश खुबलाल जयस्वार, राजू एस. कलमट्टी, अश्विन मधुकर साळवे व किरण रंगनाथ आठवले यांनी जानेवारी २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत हा गंडा घातला. एन. डी. पटेल रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून संशयितांनी ८६ लाख १० हजार रुपयांचे गृहकर्ज घेतले. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी तपास करत मुख्य सूत्रधार उगले याला पकडले. उगलेवर यापूर्वी शहरात कार लाेन मंजूर करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. संशयित उगलेने कर्जदारांचे बनावट बँक स्टेटमेंट तयार केले होते. तसेच बांधकाम व्यावसायिक लल्लन शहा यांच्या आधारकार्ड व पॅनकार्डवर स्वत:चा फाेटाे आणि जन्मतारीख टाकून तो स्वत: शहा आहे, असे भासवून बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार केले. ही कागदपत्रे अपलाेड करून त्या आधारे कर्ज प्रकरण टाकले. बँकेला कुठलाही संशय न आल्याने त्यांनी संशयितांना कर्ज मंजूर केले. उगले याने इतर पाच ते सहा संशयित कर्जदारांच्या नावे हे कर्ज त्यांच्या बँक खात्यात वर्ग हाेतील अशी व्यवस्था करून मंजूर रकमेपैकी काही रक्कम वरील कर्जदारांनाही दिल्याचे तपासात समाेर आले आहे. उगले हा खासगी एजंट असून लाेकांना गृह व वैयक्तिक कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने गंडा घालताे, असे समाेर आले आहे.

भद्रकालीत तक्रार अर्ज
आपल्या कागदपत्रांचा गैरवापर करून कोणीतरी कर्ज मंजूर केल्याचे कळताच शहा यांनी भद्रकाली पाेलिसांत तक्रार अर्ज दिला हाेता. वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांनी अर्जाची चाैकशी व स्टेट बँकेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे फसवणुकीसह कागदपत्रांचे बनावटीकरण, अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : स्टेट बँकेची ८६ लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.