नाशिक : हातरुंडी येथे दोन शाळकरी मुलींचा तलावात बुडून मृत्यू

बुडून मृत्यू

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी

हातरुंडी येथे आजोबा चिमणा भोये यांच्याकडे सुट्टीमध्ये पाहुणे म्हणून आलेल्या दोन नातींचा हातरुंडी गावाजवळील दरी या तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना (दि. 15) सायंकाळी  साडे पाच वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत हातरुंडी गावचे पोलीस पाटील मधुकर गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार, भावना भागवत गावित (८) रा. सुभाषनगर डोल्हारे व रेणुका परशराम भोये  (६) रा. सोनगीर हल्ली मुक्काम हातरुंडी या दोन्ही मुली सुट्टी निमित्ताने हातरुंडी येथे आजोबा चिमण भोये यांच्याकडे आल्या होत्या. दुपारी साडे पाच वाजेच्या दरम्यान आजोबा समवेत गावाजवळील दरी या तलावात रेड्यांना (हेले, दोबडांना) पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. रेड्यांना पाणी पाजून झाल्यावर पाण्यातून बाहेर हुसकावत असतांना पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने दोघीजणी पाय घसरुन पडल्याने दोघींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

यापैकी भावना ही जिल्हा परिषद शाळा डोल्हारे येथे दुस-या वर्गात शिकत होती तर रेणुका ही सोनगीर येथे बालवाडीत होती. नातेवाईकांनी हातरुंडी येथे धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. त्यांच्या राहत्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  यापुर्वीही तालुक्यात राशा, घागबारी येथे अशाच प्रकारे पाण्यात बुडून शाळकरी मुलींचा मृत्यू झाला होता.

पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन
सध्या शाळेला सुट्टी असल्याने ग्रामीण आदिवासी भागातील मुले आई-वडीलांना, पालकांना शेती कामात मदत करीत आहेत. जंगलातील रानमेवा, करवंदे, जांभळे, आंबे, तोरणे, अळवं, चिंचा, बोरे, टेंभरण, घळघुगरं या जंगलातील रानमेव्याचा आस्वाद घेण्यासाठी
शाळकरी मुले झाडावर चढतात. एकटे दुकटे जंगलात भटकंती करीत आहेत. तसेच तीव्र उन्हामुळे अंगाची लाही लाही होते. त्यामुळे मुलांना विहिरी, नदी, तलावात डुबक्या मारत अंघोळ करण्याचा मोह आवरत नाही. मुले पोहण्याठी नदी तलावात जात असतील तर त्यांना एकटे पाठवू नका. आपल्या नियंत्रणाखाली पोहणे शिकवावे. अन्यथा अनर्थ घडू शकतो. तसेच बक-या, गुरे चारण्यासाठी जंगलात जात आहेत. तरी पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देत खबरदारी घ्यावी असे आवाहन जल परिषद मित्र परिवार सदस्य रतन चौधरी यांनी केले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : हातरुंडी येथे दोन शाळकरी मुलींचा तलावात बुडून मृत्यू appeared first on पुढारी.