निर्यात बंदी हटवताच कांदा दरात ७५० रुपयांची वाढ

कांदा

लासलगाव पुढारी वृत्तसेवा – तब्बल पाच महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर केंद्राने कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्याचे वृत्त येताच   लासलगाव  बाजार समितीत कांद्याच्या दरात ७५० रुपयांचे भावात तेजी दिसून आली. शुक्रवारी उन्हाळ कांद्याला कमाल १८०१  रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. शनिवारी निर्यात बंदी हटताच कमाल २५५१ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. कांद्याच्या कमाल दरात  सातशे  पन्नास रुपये वाढ होऊन तेजीत विक्री झाल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, निर्यातंबदी हटवली असली तरी दुसऱ्या बाजूला कांद्याच्या निर्यातीवर सरकारनं शुल्क आकारलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्पापूर्वी शेतकऱ्यांना गिफ्ट दिल्याचे बोलले जात आहे. येणाऱ्या निवडणूकीच्या टप्यात उत्तर महाराष्ट्र मध्ये निवडणुकीची धाम धूम उडणार असून या भागातील शेतकरी कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे नाराज होते. त्यातच उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे संभाव्य सभा असल्या कारणाने शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट म्हणून सभेपूर्वीच निर्यात बंदी उठवत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. आता  कांदा निर्यातिचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य दर आकारले आहे. याच बरोबर  कांद्याची निर्यात करताना 40 टक्के निर्यात शुल्क लावले जाणार  आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्याबंदी मुळे शेतकरी नाराज होते. नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज होते मात्र या निर्यात बंदी हटवल्याच्या निर्णयाने शेतकरी आणि व्यापारी सुखावला आहे. हे बदल 4 मे पासून लागू होणार असल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा –