नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आठवड्याभरात लाेकसभा निवडणूकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने महसुल अधिकाऱ्यां कडून तयारीवर अंतिम हात फिरवला जात आहे. प्रत्येक अधिकाऱ्यावर स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली असून जिल्हास्तरावरुन त्याबाबत दरराेजचा आढावा घेण्यात येत आहे.
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणूका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सोमवारनंतर कोणत्याही क्षणी निवडणूकांचा बिगुल वाजणार असल्याने राजकीय पक्षांमध्ये उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दुसरीकडे प्रशासकीय पातळीवर निवडणूकीसाठीची आवश्यक ती तयारी अंतिम टप्यात पोेहचली आहे. जिल्ह्यात लोकसभेचे नाशिक व दिंडोरी असे दोन मतदारसंघ असून धुळे-मालेगाव अर्धा मतदारसंघदेखील आहे. त्यामुळे मतदारसंघाचा विस्तार बघता निर्विघ्न पणे निवडणूका पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
लोकसभेसाठी महसूल प्रशासनाने निरनिराळ्या समित्या गठीत केल्या आहेत. त्यामध्ये ईव्हीएम, मन्युषबळ, वाहतूक व्यवस्था, व्हीडीओ रेकॉर्डींग, खर्च नियंत्रण, भोजन, वाहनव्यवस्था अशा विविध समित्यांचा समावेश आहे. प्रत्येक समितीकरीता स्वतंत्र्य नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा हे सदर समित्यांचा दररोज आढावा घेत आहेत. आढाव्यावेळी कोठे काही कमी असल्यास ती तातडीने दुर करण्यात येत आहेत.
कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
लोकसभा निवडणूकीसाठी महसुल अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करताना प्रत्यक्ष मतदान व मतमोजणीसाठी तयारी केली जात आहे. त्याकरीता विविध शासकीय विभागांबरोबरच जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांचे कर्मचारी नियुक्त केले जात आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना तालूकास्तरावरच मतदान तसेच ईव्हीएमबाबतचे मास्टर ट्रेनरकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. या दरम्यान, कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींचे निरसन केला जात आहे.
The post निवडणूकीकरीता जबाबदाऱ्या निश्चित; जिल्हास्तरावरुन दरराेजचा आढावा appeared first on पुढारी.