पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सजतेय नाशिकनगरी

National Youth Festival www..pudhari.nashik

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद‌्घाटनाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अवघी नाशिकनगरी सजविली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर केवळ पंतप्रधान मोदी यांच्या आगमनाचा मार्ग आणि तपोवनातील कार्यक्रमस्थळच नव्हे, तर संपूर्ण शहर सजविण्याचे आदेशच महापालिकेला देण्यात आले आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी सर्व खातेप्रमुखांना जबाबदाऱ्यांचे वाटप करत दोन दिवसांत सर्व कामे पूर्ण करण्याचा अल्टिमेटमच दिला आहे.

मोदींचा हा दौरा म्हणजे नाशिककरांसाठी उत्सव असल्याने संपूर्ण शहरात उत्सवमय वातावरण तयार केले जात आहे. त्यासाठी शहरातील मुख्य रस्ते, चौकांची साफसफाई करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आले आहे. रस्त्यांवर ब्लॅकस्पॉट व कचरा दिसणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची उपलब्धता करण्याची मुभाही देण्यात आली आहे. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने संपूर्ण शहरात प्रामुख्याने प्रमुख मार्गांवर स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. मुख्य रस्त्यांवरील चौक, रस्ता दुभाजक, वाहतूक बेटे पाण्याने धुऊन काढली जात आहेत. दुभाजक, चौक तसेच वाहतूक बेटांवर रंगरंगोटी केली जात आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणारे सर्वच रस्ते धुऊन चकचकीत करण्यात येत आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, उद्यान व सहाही विभागीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरातील सहा ठिकाणी व कार्यक्रमाच्या ठिकाणी साफसफाई व स्वच्छता करणे, चौक सुशोभीकरण व रंगरंगोटीची जबाबदारी बांधकाम विभागासह घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण व जनसंपर्क विभागाकडे आहे. शहरातील सर्व मुख्य रस्ते, चौक विशेषत: पंचवटी विभागातील रस्त्यावरील अतिक्रमणे व कार्यक्रम स्थळाच्या परिसरातील अतिक्रमणे तातडीने काढून रस्ता वाहतुकीस मोकळा करून देण्याचे निर्देश अतिक्रमण निर्मूलन विभागाला देण्यात आले आहेत. शहरातील उद्याने, जॉगिंग ट्रॅक येथे कार्यक्रमाचे स्वरूप, लोगो व मॅस्कॉट लावणे, प्रवेशद्वारावर कमानी उभारण्याची जबाबदारी उद्यान व कर विभागाकडे सोपविण्यात आली आहे.

पुतळे, मंदिर, पुलांना विद्युत रोषणाई

पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने शहरातील महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करून विद्युत रोषणाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे गोदावरी नदीवरील सर्व पुलांना विद्युत रोषणाई केली जाणार आहे. नदीकाठच्या प्रमुख मंदिरांची स्वच्छता तसेच परिसरातही विद्युत रोषणाई करण्याची जबाबदारी विद्युत, बांधकाम व घनकचरा व्यवस्थापन विभागावर सोपविण्यात आली आहे. शहरातील मुख्य चौक, मुख्य रस्ते फुलांच्या माळा लावून सजविण्याचे निर्देश आहेत.

रोड शो रस्ता फुलांच्या माळांनी सजविणार

नीलगिरी बाग ते तपोवनातील कार्यक्रम स्थळादरम्यान पंतप्रधान मोदींचा रोड शो असणार आहे. हा रस्ता फुलांच्या माळांनी सजविला जाणार आहे. रस्त्याच्या दुभाजकावरही फुलांच्या माळा लावल्या जाणार आहेत. रोड शो करीत लेझिम पथक, ढोल पथक व मर्दानी खेळ आदींची व्यवस्था करण्याची जबाबादरी उद्यान, जनसंपर्क व शिक्षण विभागावर असणार आहे. तर कार्यक्रमास आवश्यक प्रसिद्धीसाठी शहरातील मुख्य चौक व परिसरात फलक लावण्याची जबाबदारी जाहिरात व कर विभागावर आहे.

सिटीलिंक करणार प्रसिद्धी

पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याच्या प्रसिद्धीसाठी सिटीलिंकचीही मदत घेण्यात आली आहे. सिटीलिंकच्या बसेसवर तसेच महापालिकेच्या वाहनांवर कार्यक्रमाची जाहिरात, स्टिकर, लोगो प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यासाठी सिटीलिंक, कर व जनसंपर्क विभागाकडे जबाबदारी देण्यात आली आहे. शहरातील मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्याच्या सूचना पशुसंर्वधन विभागाला देण्यात आल्या आहेत. शहरातील विशेषत: रामकुंड, पंचवटी, तपोवन आदी परिसरातील रस्त्यावर फिरणाऱ्या भिकाऱ्यांना बेघर निवारा केंद्रात स्थलांतरित केले जाणार आहे.

हेही वाचा :

The post पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सजतेय नाशिकनगरी appeared first on पुढारी.