नाशिक; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१२) नाशिकमध्ये २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होत आहे. तत्पूर्वी मोदींचा रोड-शो होणार आहे. पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात ते दर्शन घेणार असून, रामकुंड येथे गोदाआरती करणार आहेत. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगूल मोदींच्या या दौऱ्यात वाजणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. युवा महोत्सवासाठी पंतप्रधानांसह केंद्र व राज्यातील अर्धा डझनहून अधिक मंत्री नाशिकमध्ये उपस्थिती लावणार आहेत.
नाशिकमध्ये दि. १२ ते १६ या काळात राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. पंचवटीमधील तपोवन मैदानावर पंतप्रधानांच्या हस्ते या महोत्सवाचा मुख्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुरागसिंग ठाकूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा विभागाचे राज्यमंत्री निसिद्ध प्रमाणिक, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाचा मान यंदा महाराष्ट्रामध्ये नाशिकला प्राप्त झाला आहे. १२ ते १६ जानेवारीदरम्यान होणाऱ्या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे सकाळी १०.३० ला ओझर येथे आगमन होईल. तेथून हॅलिकॉप्टरने ते नीलगिरी बाग येथे पोहोचतील. हॉटेल मिर्ची चौक ते तपोवन मैदान असा २० मिनिटांचा रोड-शो मोदी करणार आहेत. त्यानंतर मुख्य उद्घाटन सोहळा पार पडेल. या सोहळ्यानंतर पंतप्रधान काळाराम मंदिरात दर्शन तसेच गोदाआरती करतील.
पंतप्रधानांसह विविध मान्यवर नाशिकमध्ये येत आहेत. त्यामुळे अवघ्या पंचवटीसह शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ठिकठिकाणी चोख पाेलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच युवा महोत्सवाच्या निमित्ताने विविध ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या आकर्षक स्वागत कमानी लक्ष वेधून घेत आहेत.
आठ हजार युवक दाखल
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी देशभरातून आठ हजार युवक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये खेळाडू तसेच विविध क्षेत्रांत नावलौकिक प्राप्त केलेल्या युवकांचा समावेश आहे. शहरातील विविध भागांमध्ये या युवकांच्या निवासाची सुविधा करण्यात आली आहे.
स्थानिक कलाकारांना व्यासपीठ
युवा महोत्सवामध्ये नाशिकमधील स्थानिक कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी प्राप्त होणार आहे. यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन देशाला घडणार आहे. स्थानिक लोककला, नृत्यासह विविध कलांसाठी यानिमित्ताने व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. तसेच मोदी यांच्या ‘रोड-शो’मध्ये नाशिक ढोलचे आकर्षण असणार आहे.
पाच दिवसीय युवा महोत्सव
– फोटोग्राफी स्पर्धा : कालिदास कलामंदिर
– सांघिक लोकनृत्य आणि वैयक्तिक लोकनृत्य : कालिदास कलामंदिर, नाशिक
– यंग आर्टिस्ट कॅम्प, पोस्टर मेकिंग : उदाजी महाराज म्युझियम, गंगापूर रोड
-घोषणा आणि थिमॅटिक सादरीकरण : कालिदास कलामंदिर
– सांघिक व वैयक्तिक लोकगीत : रावसाहेब थोरात हॉल गंगापूर रोड
– सुविचार, युवा संमेलन, सांस्कृतिक, युवा कृती, महाराष्ट्र युथ एक्स्पो, फूड फेस्टिव्हल : ठक्कर डोम मैदान
– साहसी उपक्रम : अंजनेरी, ठक्कर डोम, केटीएचएम बोटक्लब, चामरलेणी
– समारोप : मंगळवार (ता. १६) विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी
– फूड फेस्टिव्हल आणि विविध शासकीय व कलाकृतींचे स्टॉल हे प्रमुख आकर्षण
हेही वाचा
- PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात १९ जानेवारीला जाहीर सभा
- Shiv Sena MLA disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार
- ISRO Chairman S Somanath : ‘आदित्य एल-१’कडून आता डेटाची प्रतीक्षा : इस्रो अध्यक्षांची माहिती
The post पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज appeared first on पुढारी.