पीएम मोदींचा नाशिक दौरा; जाणून घ्या कशी असेल रामकुंडावर गोदाआरती

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीची आरती होणार आहे. मोदी हे येथील काळाराम मंदिराचे दर्शन घेणार असून त्यांच्या हस्ते रामकुंड येथे गोदा आरती होणार आहे. (PM Modi Visit Nashik)

अयोध्येत येत्या २२ तारखेला प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्यदिव्य सोहळ्याला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी नाशिकमध्ये आज (दि. 12) रोजी हाेणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद‌्घाटन मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या निमित्ताने नाशिकमध्ये गोदा आरतीच मोदी यांच्या हस्ते होणार आहे. (PM Modi Visit Nashik)

प्रभू श्रीरामांचे आणि नाशिकचे नाते अतूट नाते आहे. या कुंभनगरीतून दक्षिणवाहिनी गंगा-गोदावरी अविरत प्रवाहित वाहते. राजा दशरथांच्या अस्थींचे विसर्जन ज्या पवित्र रामकुंडात झाले त्या रामकुंडावर वाराणसी तसेच हरिद्वारच्या धर्तीवर गोदा महाआरती करावी, अशी नाशिककरांची भावना होती.  पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते  गोदा आरती होणार असलेल्याने नाशिककरांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे.

रामकुंडावर गोदाआरतीला महत्व का?

रामकुंडावर अरुणा व गोदावरी नदीचा संगम होतो. सिंहस्थ कुंभमेळा देखील येथेच भरतो. प्रभू श्रीरामचंद्रांनी देखील या ठिकाणी स्नान केले आहे.  त्यामुळे रामकुंडावर गोदा आरती करण्याला विशेष महत्त्व आहे. गोदा आरतीला अनेक वर्षांची परंपरा आहे. गोदाआरती शक्तीची उपासना आहे.  येथील पुजारी वर्षानुवर्षे गोदा आरती करत आले आहे. गेल्या काही वर्षांत त्यात खंड पडला आहे. गोदा आरती ही गोदावरी नदीचे भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक जीवनातील महत्त्व कथन करणारी आहे. अशी माहिती गोदावरी प्रेमी व नदी अभ्यासक देवांग जानी यांनी दिली.

रामकुंडावरील गोदा आरतीला विशेष महत्त्व आहे. याठिकाणी आठ कुंड मिळून एक रामकुंड अखंड करण्यात आले आहे. मात्र गोदावरीचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याने गोदावरीचा श्वास कोंडला आहे. गोदावरी काँक्रिट मुक्त करून त्याठिकाणी गोदाआरती व्हायला हवी. गोदाआरती करताना ती ज्याप्रमाणे गंगेची आरती करतात त्या धर्तीवर नियमीत व्हायला हवी.
– देवांग जानी , गोदा प्रेमी सेवा समिती अध्यक्ष

गोदावरीचे सर्वाधिक महत्त्व रामकुंडावर आहे. त्यामुळे रामकुंडावर गोदा आरतीचे महात्म्य मोठे आहे. येथील रामतीर्थास विशेष महत्त्व आहे. गोदावरीचे पावित्र्य बघता तिला गंगेची बहिणी मानले जाते. याठिकाणी नियमीत आरती व्हावी अशी मागणी आम्ही करत आहोत.
– सतीश शुक्ल, पुरोहित संघ

हेही वाचा

The post पीएम मोदींचा नाशिक दौरा; जाणून घ्या कशी असेल रामकुंडावर गोदाआरती appeared first on पुढारी.