पिंपळनेर : धडे गिरवताना शाळेची भिंत कोसळली; विद्यार्थी, शिक्षकांमध्ये घबराट

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर (ता. साक्री) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील सुरपान येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची ५० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या कौलारू इमारतीची भिंत पहिल्याच पावसात कोसळली. भिंतीची माती आणि दगड पडायला सुरुवात होताच विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेर पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेने जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

साक्री तालुक्यातील सुरपान जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवी या वर्गात सुमारे १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत जीर्ण झालेल्या इमारतीत बसून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. सन २०१८ पासून शाळेत नवीन खोल्या बांधण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी शाळेची भिंत पडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, यावेळी माजी खासदार बापूसाहेब चौरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि शिक्षण सभापती महावीरसिंग रावल, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, पंचायत समिती सभापती शांताराम कुवर, शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, बाजार समितीचे उपसभापती भानुदास गांगुर्डे, गटविकास अधिकारी सोनवणे, पंचायत समिती सदस्य रमेश सूर्यवंशी, राजू चौरे, जिल्हा परिषद सदस्य तात्या ठाकरे, विजय ठाकरे यांच्यासह बांधकाम आणि शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शाळेची पाहणी केली.

सुरपान येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग आहेत. ५० वर्षांपूर्वीची इमारत पूर्णपणे जीर्ण होऊन पावसाचे पाणी भिंतीमध्ये झिरपत आहे. त्यामुळे शाळेचे पाचही वर्ग नवीन मंजूर करण्यात येऊन नवीन बांधकाम करण्याचे आश्वासन शिक्षण सभापती रावल तसेच कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांनी दिले. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासनही पालकांना दिले.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : धडे गिरवताना शाळेची भिंत कोसळली; विद्यार्थी, शिक्षकांमध्ये घबराट appeared first on पुढारी.