नाशिक : पाऊस सुरु होताच पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली

नाशिक, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात उशिराने मान्सूनचे आगमन झाले आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यात वरुणराजा बरसल्याने नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस झाल्याने धबधबे वाहण्यास प्रारंभ झाला आहे. रविवारी (दि.२) पावसाने काही उसंत घेतल्याने पर्यटकांनी शहरालगतच्या पर्यटनस्थळी गर्दी केल्याचे चित्र बघावयास मिळाले. विशेषत: तरुणाईने वर्षा पर्यटनाची मजा लुटली.

पावसाच्या दमदार हजेरीनंतर इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा, कुरुंगवाडी तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधबा, पेगलवाडी, पहिणे, आंबोली आदी परिसरात पावसाळी पर्यटन पुन्हा बहरल्याचे चित्र होते. शहरालगतच्या सोमेश्वर धबधबा, गंगापूर तसेच कश्यपी धरण, दरी-मातोरी आदी परिसरातही वीकेण्डला पर्यटकांनी हजेरी लावत गर्दी केली. पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने जागोजागी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत होता.

पावसाळी पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांच्या गर्दीने इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील हॉटेल-ढाबे फुल्ल झाले होते. विशेषत: पहिणे परिसरातील हॉटेल-ढाब्यांना पर्यटकांची पसंती मिळल्याचे दिसून आले. ग्राहकांना आर्कषित करण्यासाठी हॉटेल-ढाबे चालकांकडून विविध क्लृप्त्या लढविल्या आहेत. दरम्यान, डोंगरमाथ्यावरून कोसळणार्‍या धबधब्यांवर तरुणांकडून केलेल्या जाणार्‍या जीवघेण्या स्टंटमुळे मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे हौशी पर्यटकांना आळा घालण्याची मागणी होत आहे.

मक्याच्या कणसावर ताव

पावसात भिजल्यानंतर गरमागरम चहासोबत कुरकुरीत भजीचा आस्वाद पर्यटक घेतात. भाजलेल्या भुईमुगांच्या शेंगा आणि मक्याचे कणीस तेही लिंबू मारून दिले जात असल्याने पर्यटकांची विशेष दाद मिळत असल्याचे सर्वत्र दिसून आले.

हेही वाचा : 

The post नाशिक : पाऊस सुरु होताच पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली appeared first on पुढारी.