नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आम्हाला खोदकाम करताना सोन्याचे दागिने सापडले आहेत, आम्ही तुम्हाला कमी किमतीत देतो असे सांगून शहरातील नागरिकांना फसवणाऱ्या परप्रांतीय टोळीचा छडा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने लावला आहे. या टोळीकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तिघांना अटक केली आहे. संशयितांनी शहरातील काही नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.
केशाराम पिता सवाराम (रा. सांचोर, राजस्थान), बाबुभाई लुंबाजी मारवाडी (रा. गुजरात) आणि रमेशकुमार दरगाराम (रा. जालोर, राजस्थान) अशी संशयितांची नावे आहेत. तिघे संशयित १० ते १५ जणांसमवेत काही दिवसांपासून तवली फाटा परिसरात तंबू टाकून राहात होते. तिघांनी शहरातील मिठाईविक्रेत्याकडे जाऊन सोने विक्री करत असल्याचे सांगितले. विक्रेत्याचा विश्वास बसण्यासाठी संशयितांनी त्याला सोन्याचे दोन मणी देत खात्री करण्यास सांगितले होते. शहानिशा केल्यावर ते सोन्याचे मणी निघाल्याने मिठाईविक्रेत्याने २० हजार रुपयांचे दागिने घेतले, मात्र ते बनावट निघाले. त्यामुळे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून तिघांना पकडले. त्यांच्याविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास केला जात आहे. दरम्यान, याची माहिती मिळाल्यानंतर शहरात इतर दोघांनीही पोलिसांशी संपर्क साधून तीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिस तपास करीत आहेत. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार संदीप भांड, महेश साळुंके, मिलिंद परदेशी, विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, आप्पा पानवळ, राजेश राठोड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
मिठाईविक्रेत्याच्या सतर्कतेने गजाआड
शहरातील मिठाईविक्रेत्यास संशयितांचा संशय आला होता. त्यामुळे त्यांनी याची माहिती गंगापूर पोलिसांना दिली होती. गंगापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेला याची माहिती दिली. त्यानंतर मिठाईविक्रेत्याच्या मदतीने संशयितांचा छडा लावून त्यांना पाठलाग करीत पकडले.
दिवसभर रेकी
संशयित हे भांडी विक्रीच्या बहाण्याने शहरात दिवसभर फिरून रेकी करत होते. ग्राहकास हेरून ते बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांचा विश्वास संपादन करीत सोन्याचे दागिने दाखवत असत. त्यासाठी संशयित बोटांमध्ये खरे दागिने लपवत असे व तेच दागिने शहानिशा करण्यासाठी देत होते. त्यानंतर खरे दागिने देऊन समोरच्याचा विश्वास संपादन करत होते. व्यवहार करताना मात्र बनावट दागिने देऊन संशयित फरार व्हायचे.
मोबाइल, सीमचा असाही वापर
पकडले जाऊ नये यासाठी संशयितांनी काळजी घेतली होती. एखादा ग्राहक फसवल्यानंतर ते त्याच्याशी ज्या सीमकार्ड व मोबाइलवरून बोलत असत, ते सीमकार्ड व मोबाइल हे काम फत्ते झाल्यानंतर नष्ट करत होते. पुन्हा दुसऱ्या वेळी नवे सीमकार्ड व मोबाइल वापरत असत. त्यासाठी कधीकधी ते चोरीचा मोबाइलही वापरत होते.
सातपूरच्या घटनेनंतर शहरातील इतर दोन घटना समोर आल्या आहेत. त्या प्रकरणी गुन्हे दाखल केले जात आहेत. संशयितांनी अनेकांना फसवल्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी गुन्हे शाखा युनिट एकच्या कार्यालयात संपर्क साधावा. – विजय ढमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे एक.
काही क्षणांत इतर फरार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांची धरपकड केल्यानंतर तवली फाटा येथे जाऊन पाहणी केली. त्यांच्याकडून बनावट सोन्याचे दागिने, मोबाइल, सीम जप्त केले. त्यानंतर अर्धा ते एक तासाने पोलिस पुन्हा संशयित राहात असलेल्या जागेवर गेले असता, तेथे काहीच आढळून आले नाही. संशयितांच्या सोबत असलेल्यांनी सर्व संसार आवरून तेथून पळ काढला. पोलिसांनी आजूबाजूचा दोन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला, तरी ते आढळून आले नाही.
हेही वाचा:
- Maratha Aarakshan : मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा इतिहास आणि घटनाक्रम
- पुण्यातील पत्रकार मारहाणीचा निषेध
- पुण्यातील पत्रकार मारहाणीचा निषेध
The post परप्रांतीय टोळी : सोने सांगून पितळी दागिने देत गंडा appeared first on पुढारी.