नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या शिक्षण विभागाने २०१७ मध्ये राबविलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील ९७३ उमेदवारांचे परीक्षा शुल्क तब्बल साडेसहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर परत मिळणार आहे. भरती प्रक्रिया रद्द झाल्यानंतरही शिक्षण विभागाने हे पैसे परत केले नव्हते. त्यामुळे उमेदवारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. अखेर थकीत असलेले तीन लाख २७ हजार ७०० रुपये उमेदवारांना परत करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून, हे शुल्क परत करण्यासाठी उमेदवारांच्या बँक खात्यांची माहिती पुढील दहा दिवसांत शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी बी. टी. पाटील यांनी केले आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत जून २०१७ मध्ये विनाअनुदानित मराठी माध्यमाच्या ५ व अनुदानित उर्दू माध्यमांच्या चार शाळांमध्ये मानधन तत्त्वावर २१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन त्यात खुल्या प्रवर्गातून ५०० व राखीव प्रवर्गातून ३०० रुपये शुल्क भरून घेण्यात आले होते. राज्यभरातील ९७३ इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केले होते. मात्र, तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदांची आवश्यकता नसल्याचे कारण देत ही भरती प्रक्रिया रद्द केली. त्यामुळे या उमेदवारांची परीक्षा झालीच नाही. तसेच रद्द केलेल्या भरती प्रक्रियेच्या संदर्भात उमेदवारांना कोणतीही सूचना देण्यात आली नाही. भरती प्रक्रिया रद्द झाल्यामुळे उमेदवारांचे भरलेले शुल्क परत करणे अपेक्षित होते. परंतु, ही भरती प्रक्रिया रद्द करून साडेसहा वर्षे उलटूनही उमेदवारांना शुल्क परत करण्यात आलेले नाही. एकीकडे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या नशिबी बेरोजगारी असताना दुसरीकडे उमेदवारांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. त्यामुळे पैसे परत मिळविण्यासाठी महापालिकेकडे उमेदवारांनी अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्यांना समाधानकारक प्रतिसाद देण्यात आलेला नाही. त्यामुळे उमेदवारांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता पालिकेला जाग आली असून, शिक्षण विभागाने या उमेदवारांचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
उमेदवारांना आवाहन
शिक्षण विभागाने या उमेदवारांसाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध केली असून, त्यांना शुल्क परताव्यासाठी बँक खात्याची माहिती शिक्षण विभागाकडे सादर करण्याकरिता १० दिवसांची मुदत दिली आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले आहे, त्या उमेदवारांनी त्यांचे बँक खाते, पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
The post परीक्षा शुल्क मिळण्यासाठी बँक खात्याची माहिती सादर करा appeared first on पुढारी.