पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्याचे उद्दिष्ट : ॲड. उज्ज्वल निकम

अॅड. उज्वल निकम,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वकिली व्यवसायात कार्यरत असताना अनेक आव्हानात्मक खटले हाताळण्याची संधी मिळाली. त्यातीलच अजमल कसाब खटल्याच्या माध्यमातून कसाबला केवळ फाशी देणे, हे उद्दिष्ट नव्हते. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणणे हे मुख्य उद्दिष्ट होते, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे देण्यात येणारा 2022 चा जीवनगौरव पुरस्कार रामदास भटकळ यांना, तर साहित्य सेवा कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ लेखक आणि कवी प्रवीण दवणे यांना ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत निकम बोलत होते. यावेळी व्यासपीठावर या संमेलनाचे अध्यक्ष अशोक कोठावळे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, नाशिक शाखेचे अध्यक्ष विलास पोतदार, कार्यवाह सुभाष सबनीस, उपाध्यक्ष वसंत खैरनार आणि प्रमुख कार्यवाह पराग लोणकर आदी उपस्थित होते.

यावेळी संवेदना प्रकाशन पुरस्कृत मुद्रित शोधनातील विशेष पुरस्काराने सुषमा देशपांडे यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ग्रंथनिर्मिती पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले.

यावेळी उज्ज्वल निकम म्हणाले की, रेणुका आणि सीमा गावित या गावित भगिनींना फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा तो माझ्या करिअरच्या समाधानाचा सर्वोच्च टप्पा होता. कोल्हापूर न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मी जेव्हा न्यायालयाच्या बाहेर आलो, तेव्हा या खटल्याशी दुरान्वये नसलेली 50 मुले बाहेर साखर वाटण्यासाठी उभी होती. विज्ञानाचा विद्यार्थी असूनही माझे मराठी भाषेवर प्रचंड प्रेम आहे. ऐतिहासिक कादंबऱ्या वाचण्याचा छंद मला पहिल्यापासून होता. अनुभवाने मी माणसांचे चेहरे वाचायला लागलो, त्यांना ओळखायला लागलो. त्याचा मला माझ्या व्यवसायात फायदा झाला. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे मधुर बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

वयाची 80 वर्षे ओलांडल्यानंतर कोणताही पुरस्कार स्वीकारायचा नाही, हा ग. प्र. प्रधान यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी वाटचाल करीत होतो. आजचा पुरस्कार अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा पुरस्कार असल्याने मी हा पुरस्कार स्वीकारला.

– रामदास भटकळ (पुरस्कारार्थी)

लेखक एकांतात एकटाकी लेखन करीत असतो. मी कधीही कुठल्याही गटातटात न अडकता साहित्यसेवा करीत राहिलो. मला आज मिळालेला हा पुरस्कार म्हणजे माझ्या प्रदीर्घ लेखन कौशल्याचा सन्मान आहे, असे मी मानतो. तुम्ही पोटतिडकीने काम करीत असाल, तर तुमच्या सगळ्या उपक्रमांना यश मिळतेच. अलीकडच्या प्रकाशकांनीदेखील लेखक- कवी घडवण्याची प्रक्रिया पुनरुज्जीवित करावी.

– प्रवीण दवणे (पुरस्कारार्थी कवी)

 

हेही वाचा :

The post पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्याचे उद्दिष्ट : ॲड. उज्ज्वल निकम appeared first on पुढारी.