
सर्वत्र लोकसभा निवडणूक 2024 चे रंग चढू लागले असून कुठे सभा, मेळावे भरत आहेत. तर कुठे मत एकगठ्ठा मिळवण्यासाठी राजकीय फडासाठी रात्रीस खेळ चालतोय. “बदलल्या पिढ्यान पिढ्या अन् माझं सरकारही बदलल पण लेकरा तुझ्या नशीबी अजूनही घोटभर पाण्यासाठी वणवण”! असं म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील अनेक गावात आली आहे. पिढ्या, सरकार बदलली असली तरी विकास थांबला असून येथे मात्र उन्हाचा पारा तेवढा वाढतो आहे.
तप्त उन्हाच्या काहीलीत घोटभर पाण्यासाठी आईसोबत चिमुकल्यांची पायपीट होत आहे. आजही अशी गावं आहेत, जिथे पाण्यासाठी थोरा मोठ्यांसोबत चिमुकल्यांनाही पाण्यासाठी वणवण करावीच लागत आहे. विकासाचा दाखला, विकासाचा हिशोब प्रचारपत्रकातून मांडतांना मात्र गावात होणार चिमुकल्यांची मैलोन मैल पायपीट मांडली जात नाही. पिढ्यानं पिढ्या ही मैलोन मैल पायपीट अशीच पुढच्या पिढीलाही करावी लागत असल्याचे यावरुन दिसून येत आहे. हीच ती चिमुकली पावलं आणि पिढी.
चांदवड तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी माळरानावर भटकंती होत आहे. चांदवड तालुक्यातील वडाळीभोई ते वणी रस्त्यावरील माळरानावर गोहरण वस्ती असून या वस्तीतील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी माळरानातील एका विहिरीचा आधार आहे. वस्तीपासून दीड किलोमिटरची पायपीट करत पाणी आणावे लागते. सायकलीवर आणि डोक्यावर दिवसभर पाणी आणावे लागत आहे. माळरानावर असल्याने या वस्तीकडे कुणाचेही लक्ष नाही. निदान पाण्याचा टँकर तरी मिळावा अशी माफक अपेक्षा येथील ग्रामस्थ करीत आहे.