पीएफ कार्यालयाचा नाशिक महापालिकेवर कारवाईचा बडगा

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – महापालिकेच्या विविध विभागांतर्गत काम करणाऱ्या ठेकेदारांनी कंत्राटी कामगारांचा पीएफ बुडविल्याप्रकरणी पीएफ कार्यालयाने महापालिकेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कायदेशीर कारवाई करण्यासह बँक खाती गोठविण्याचा इशारा पीएफ कार्यालयाने दिल्याने महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. समाजकल्याण विभागाने संबंधित विभागांना पत्र पाठवत ठेकेदेारांकडून कामगारांच्या प्रलंबित पीएफची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत.

नाशिक महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या ठेकेदारांनी एप्रिल २०१६ ते आॉगस्ट २०१६ या कालावधीत कंत्राटी कामगारांच्या ईपीएफसंदर्भात पूर्तता केलेली नाही. पीएफ भरणा केल्याबाबतचे कोणतेही पुरावे सादर केलेले नसल्याने संबंधीत ठेकेदारांची भविष्य निर्वाह निधीची १७ लाख ७६ हजार २९५ इतकी रक्क्म प्रदेय होत असल्याचे पीएफ कार्यालयाने मनपाच्या समाजकल्याण विभागाला पत्राद्वारे कळविले आहे. त्यानुसार समाजकल्याण विभागाचे प्रभारी उपायुक्त मयुर पाटील यांनी मनपाच्या आपल्या विविध विभागांना पीएफसंदर्भातील माहिती कळवत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या अहवालात समावेश असलेल्या ठेकेदारांकडून त्यांच्याकडे एप्रिल ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत नाशिक मनपाच्या कामांसाठी कार्यरत कंत्राटी कामगारांचे पीएफ अंशदानाची पूर्तता केलेली आहे किंवा नाही, केलेली नसल्यास संबंधित मक्तेदारांकडून पूर्तता करुन घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. ठेकेदारांकडून भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेची वसुली केल्याशिवाय देयक अदा करण्यात येऊ नये, अशी सूचना देखील समाजकल्याण विभागाकडून करण्यात आली आहे.

खातेप्रमुखांवर कारवाई होणार

ठेकेदारांनी कंत्राटी कामगारांच्या पीएफची रक्कम जमा केली आहे की नाही यासंबंधी खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित खातेप्रमुखांची होती. आता भविष्य निर्वाह निधी अंशदानाची रक्कम न अदा केल्यास नाशिक महापालिकेविरुध्द कायदेशीर कार्यवाही किंवा बँक खाते गोठविण्याची प्रक्रीया होऊ शकते. त्यामुळे या कारवाईला संबंधित खातेप्रमुख तसेच विभागप्रमुख जबाबदार असतील, असा इशारा समाजकल्याण विभागाचे उपायुक्त मयुर पाटील यांनी दिला आहे.

हेही वाचा: