‘पुढारी’च्या वतीने मातृदिनानिमित्त विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – “ती आहे म्हणूनच सर्व काही आहे. ती आहे म्हणूनच वात्सल्य आणि प्रेम टिकून आहे.” मातृ दिनाचे औचित्य साधत ‘पुढारी’ ने नाशिकमधील स्त्रीशक्तीचा गौरव करत समाजप्रबोधनाचा अनोखा अध्याय लिहिला. पुढारीतर्फे नारीशक्तीच्या अनुभवांवर आधारित ‘नारीशक्ती’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सदर सोहळ्याप्रसंगी या नारीशक्तीचा सन्मान करण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांच्यासह गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे आणि सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक चंदे या अतिथींसह ‘पुढारी’चे निवासी संपादक, युनीट हेड राजेश पाटील यांची उपस्थिती होती.

नारीशक्ती www.pudhari.news
नाशिक : दैनिक ‘पुढारी’ च्या वतीने मातृदिनानिमित्त आयोजित सोहळ्याचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करताना ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने, समवेत दीपक चंदे, शर्मिष्ठा घारगे वालावलकर, डॉ. दीप्ती देशपांडे. (छाया: हेमंत घोरपडे)

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी निर्मिती ॲडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित आणि किशोरी किणीकर यांनी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांची प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीमध्ये त्यांनी आजवरच्या सिने-नाट्य अभिनयाच्या वाटचालीचे अनुभव उलगडत प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक पुढारीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी केले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन किशोरी किणीकर यांनी केले, तर दैनिक पुढारीचे जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब वाजे यांनी आभार मानले.

नारीशक्ति सन्मान www.pudhari.news

स्त्रीला स्वत:ला सिद्ध करावेच लागते : शर्मिष्ठा वालावलकर
स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरते आहे. विकासप्रक्रियेमध्ये तिचे स्थान आता महत्त्वाचे झालेले आहे. तरीही स्त्री कोणत्याही क्षेत्रात असली, तरी तिला स्वत:ला सिद्ध करावेच लागते. असे केले, तरच बाकी स्त्रियांनाही समाजात सन्मानाचे स्थान मिळेल. ‘पुढारी’ ने या महिलांना पुरस्काराने गौरवले आहे. त्यामुळे आता या महिलांमुळे प्रेरणा घेणाऱ्या अनेक महिला तयार होतील. हा पुरस्कार मिळाल्याने महिलांची जबाबदारी वाढली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘पुढारी’ने ही संधी महिलांना उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.

आईच्या प्रेमाला पर्याय शोधणे अशक्य : डॉ. दीप्ती देशपांडे
समाजात अनेक वैज्ञानिकांमुळे विज्ञान इतके पुढे गेले की, जी पॅट आणि रोबोट यांसारखी उपकरणे तयार झाली आहेत. मात्र, तरीदेखील ते आईच्या प्रेम, वात्सल्याला पर्याय शोधू शकलेले नाहीत. हिंदू संस्कृतीत शक्ती आणि प्रकृती ही दोन स्त्री स्वरूपातील तत्त्वे आहेत. ती तत्त्वे आपल्याला आपल्या आईमध्येच सापडतात. माझ्या आयुष्यात माझ्या आईचे स्थान खूप मोलाचे आहे. आईने स्त्री सबलीकरणासाठी आयुष्य वेचले. मलाही तिने तेच संस्कार दिले. त्यामुळे आजही तिच्या मार्गाने चालत आहे. यावेळी त्यांनी फ. मु. शिंदे यांची कविता उपस्थितांना ऐकवली. ‘पुढारी’ने केलेल्या या अनोख्या कार्यक्रमाचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

सन्मानार्थी मातांचे अभिनंदन : दीपक चंदे
दैनिक ‘पुढारी’ नेहमीच समाजातील घटकांचा गौरव करण्याचा आदर्शवत उपक्रम करत असतो. सर्व सन्मानार्थी मातांचे अभिनंदनास पात्र आहेत. ‘पुढारी’च्या वतीने काढण्यात आलेल्या नारीशक्ती या अतिशय उत्तम पुस्तकाबाबत त्यांनी कौतुक केले.