पोलिस असल्याचे सांगत वृद्धास गंडा, सोन्याचे दागिने पळवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पोलिस असल्याची बतावणी करीत दोघांनी मिळून ७४ वर्षीय वृद्धास गंडा घातला. वाहनाची तपासणी करण्याच्या बहाण्याने दोन्ही भामट्यांनी वृद्धाकडील ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळविले. काठे गल्लीतील बनकर चौक परिसरात हा प्रकार घडला.

विक्रम मोतीराम निकम (७४, रा. काठे गल्ली) यांच्या फिर्यादीनुसार, भामट्यांनी गुरुवारी (दि. २३) सकाळी 10 च्या सुमारास बनकर चौकातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राजवळ फसवले. निकम हे परिसरातून जात असताना दुचाकीस्वार दोघे त्यांच्याकडे आले. त्यांनी दोघांची ओळख पोलिस असल्याचे सांगत निकम यांच्या दुचाकीची तपासणी करण्याचा बहाणा केला. त्याचप्रमाणे निकम यांच्या अंगावरील सोन्याचे दगिने काढून ते डिकीत ठेवण्याच्या बहाण्याने दागिने लंपास केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या हालचाली परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.

एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने वृद्धेस गंडा

नाशिक : एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एकाने वृद्धेच्या एटीएम कार्डचा वापर करून परस्पर ३० हजार रुपये काढून फसवणूक केली. सोमवारी (दि. २७) जेलरोड येथील एसबीआय बँकेच्या एटीएम केंद्रात हा प्रकार घडला. अलका शिवाजी पाटील (६४, रा. जुना सायखेडा रोड, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्या सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पैसे काढून देण्याच्या बहाण्याने भामट्याने त्यांचे एटीएम कार्ड घेत त्यांना दुसरे कार्ड दिले. त्यानंतर त्याने अलका यांच्या एटीएम कार्डचा वापर करून त्यातून ३० हजार रुपये परस्पर काढले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अलका यांनी नाशिक रोड पोलिसांकडे धाव घेतली. नाशिक रोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा –