बनावट नोटांचा तपास अंधातरी, पथकप्रमुखही अनभिज्ञ?

नाशिक बनावट नोटा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवाउपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन महिलांकडून पाचशे रुपयांच्या २० बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या होत्या. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असला तरी त्यात अद्याप अपेक्षित यश मिळत नसल्याचे सुत्रांनी सांगितले. या गुन्ह्यातील बनावट नोटा महिलांनी कोठून आणल्या, कोठे छापल्या, कोणामार्फत मिळाल्या याचा तपास अद्याप झालेला नसल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

मुक्तिधाम परिसरात संशयित स्वाती आहिरे आणि पूजा कहाने या दोघींना पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अटक केली. त्यांच्याकडून दहा हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या दोघीही गृहिणी आहेत. या कारवाईपूर्वीदेखील अंबड पोलिसांनी बनावट नोटा बाळगणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या होत्या. त्यामुळे शहरात बनावट नोटा चलनात आणण्यासाठी टोळी सक्रीय झाल्याची चर्चा आहे. अंबड पोलिसांनी त्यांच्या गुन्ह्याचा तपास केल्याचे समजते. मात्र महिलांकडे आढळलेल्या नोटांचा तपास अद्याप अंधारात असल्याचे बोलले जात आहे. गृहिणी असलेल्या दोन्ही संशयित महिलांकडे बनावट नोटाची पार्श्वभूमीसह अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही गुलदस्त्यात आहेत. पोलिसांनीही अद्याप धागेदोरे हाती न लागल्याचा दावा केला आहे. गुन्हे शाखा युनिट दोन, गुंडा विरोधी पथक, उपनगर पोलिस अशी तीन पथके या कारवाईत सहभागी असूनही पोलिसांच्या हाती धागेदोरे न सापडल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

प्रमुख अधिकारीच अनभिज्ञ

उपनगर हद्दीतील बनावट नोटांची माहिती गुंडाविरोधी पथकाच्या अंमलदारास मिळाली होती. तर कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकातील अधिकाऱ्यांना सोबत घेत करण्यात आली. गुन्हा उपनगर पोलिसांत दाखल झाला. गंभीर बाब म्हणजे, गुन्हे पथक व गुंडा विरोधी पथकाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना या गुन्ह्यासंदर्भात पुरेशी माहिती नसल्याचेही समोर येत आहे.

हेही वाचा-