बांगलादेशला ५० हजार मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी

कांदा

लासलगाव वृत्तसेवा – मागच्या तीन महिन्यापासून केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली असून दि. १ पासून नॅशनल को- ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत बांगलादेशला ५० हजार मेट्रीक टन कांद्याच्या निर्यातीला केंद्राकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र जी निर्यात अगदी नगण्य असल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होणार नसल्याचे शेतकरी वर्गाचे सांगणे आहे.

दरम्यान, ७ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे कांद्याचे दर कोसळले होते. यामध्ये राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पण सध्या सरकारने बांग्लादेशला कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली असून ती केवळ ५० हजार मेट्रीक टन एवढीच आहे. त्यामुळे या निर्यातीचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

मोठ्या प्रमाणात कांदा विक्री केल्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे कांदा उरलेला नाही. सध्या शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागला आहे. गेल्या हंगामात पर्जन्यमान कमी झाल्याने राज्यात पाण्याच्या अभावामुळे कांद्याची लागवड कमी झालेली आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या कांद्याची आवक कमी आहे. तर बांग्लादेशात होणारी कांदा निर्यात ही सरकारच्या संस्थेकडून होणार आहे. ग्राहक व्यवहार विभागाशी सल्लामसलत करून NCEL कडून ही निर्यात केली जाणार आहे. देशात नोंदणीकृत १५०० निर्यातदार असतांना ही एजन्सी मार्फत कांदा निर्यात होणार असल्याने व्यापारी वर्ग या निर्णयामुळे नाराज आहे.

“ही कांदा निर्यात सरकार स्वतः करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त फायदा होणार नाही. कारण फक्त ५० हजार टन कांदा बांगलादेशला निर्यात होणार आहे. अशा अटी शर्ती असलेल्या कांदा निर्यात बंदी उठून शेतकऱ्यांचा जास्त फायदा होत नाही. – भारत दिघोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

हेही वाचा :

The post बांगलादेशला ५० हजार मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी appeared first on पुढारी.