सलग दोन दशके जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रं सांभाळणारे बाहुबली मंत्री छगन भुजबळ यांच्या मनात अलीकडे काय चालले आहे, याचा अदमास लागणे तूर्तास सर्वांनाच कठीण होऊन बसले आहे. लोकसभा उमेदवारी नाकारल्यापासून ते महायुतीसोबत केवळ अंतर राखून आहेत असे नाही, तर अनेकदा स्पष्टोक्तीयुक्त वाग्बाण सोडून त्यांनी विरोधी भूमिका घेण्यासही हातचे राखलेले नाही. भुजबळ यांच्या या भूमिकेमुळे महायुतीचे शीर्षस्थ नेतृत्व बुचकळ्यात पडले असल्यास नवल नाही. शिवाय, भविष्यात ते वेगळी वाट चोखाळतात का, अशा सार्वत्रिक चर्चा आता झडू लागल्या आहेत.
जात्याच आक्रमक स्वभाव असलेले भुजबळ हे सत्तेमध्ये असो की विरोधात, स्पष्ट आणि परखड भूमिकांमुळे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. सध्या महायुती नामक राजकीय व्यवस्थेचा भाग असलेले भुजबळ पुन्हा राज्यभर चर्चेमध्ये आले, ते नाशिक क्षेत्रातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या वार्तेने. भाजपचे चाणक्य मानल्या जाणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पसंतीचे शिक्कामोर्तब असल्याने भुजबळ यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत होती. तथापि, कुठेतरी माशी शिंकली आणि भुजबळ यांचे नाव मागे पडले. तशी जाणीव होताच त्यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघारी जात असल्याचे माध्यमांसमोर जाहीर केले. त्यानंतर महायुतीच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर होऊनही भुजबळ यांची महायुतीशी सलगी फक्त बड्या नेत्यांच्या उपस्थितीदरम्यानच दिसून आली.
निवडणुकीदरम्यान शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचा वेध घेत सर्वसामान्यांचा त्यांना पाठिंबा असल्याचे वक्तव्य करून भुजबळ यांनी खळबळ माजवून दिली होती. नंतर सारवासारव करण्याची अपरिहार्यता त्यांना स्वीकारावी लागली, हा भाग अलाहिदा. अलीकडे घाटकोपर परिसरात कोसळलेल्या महाकाय होर्डिंगवरून उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांंच्या रडारवर असताना भुजबळ यांनी त्यांना दाखवलेला सॉफ्ट कॉर्नर, पक्ष बैठकीत विधानसभेला अमुक एका प्रमाणात जागा मागण्याची घेतलेली आग्रही भूमिका, मनुस्मृती दहन प्रकरणात चौफेर टीकेच्या भडिमाराला सामोरे गेलेल्या जितेंद्र आव्हाडांंची घेतलेली कड, याप्रकरणी भाजप प्रवक्त्याला दिलेले प्रत्युत्तर या सर्व ठळक घटना भुजबळ हे महायुतीशी विपरित भूमिका घेत आहेत, हे म्हणण्याला पूरक वाटतात. भुजबळ यांची ही मानसिकता ते वेगळ्या वहिवाटेकडे जात तर नाहीत ना, अशी शंका घेण्यास पुरेशी वाटते. याच अनुषंगाने भविष्यात, त्यांची राजकीय दिशा नेमकी कुठे राहणार आहे, याबाबतही चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील बडे नेते म्हणून छगन भुजबळ यांची देशभर ख्याती राहिली आहे. याच कारणाने त्यांनी थेट राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. पूर्वार्धात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उत्तरार्धात शरद पवार यांच्या शिष्योत्तमांच्या सूचीत राहिलेल्या भुजबळ यांनी आता राष्ट्रीय राजकारणात यावे, ही दस्तुरखुद्द अमित शाह यांची अंत:स्थ इच्छा असल्याचे उघड झाले आहे. त्याच अनुषंगाने त्यांच्या लोकसभा उमेदवारीचा घाट घालण्यात आला होता. त्याला महायुतीच्या राज्य नेतृत्वाने खोडा घातल्यानंतर आता भुजबळ यांना राज्यसभेवर घेऊन त्यांचा राष्ट्रीय राजकारणाचा मार्ग निष्कंटक करण्याची शाह यांची खेळी आहे. तथापि, लोकसभेत आलेले विघ्न आता किमान राज्यसभा गाठण्यात येऊ नये, म्हणून भुजबळ विपिरत विधाने करून स्वकीयांवर दबावतंत्र तर वापरत नाहीत ना, असाही चर्चेचा सूर उमटत आहे.