भाजप आ. देवयानी फरांदे यांची माहिती

आमदार देवयानी फरांदे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यापक जनसंपर्कासाठी भाजपतर्फे ११ फेब्रुवारीपर्यंत ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, अशी माहिती आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली.

तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे गेल्या दहा वर्षांतील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचवण्याच्या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. मोदींची गॅरंटी काय आहे हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात येणार असल्याचे फरांदे यांनी सांगितले. शहरी भागात वॉर्डनिहाय हे अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत राज्यात ५० हजार गावांमध्ये भाजपचे ५० हजार प्रवासी नेते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहेत. पक्षाचे आजी व माजी खासदार, आमदार, जि. प. सदस्य यांच्यासोबतच सर्व नेतेमंडळी जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रवास करतील व त्यांना सुपर वॉरियर्सचेदेखील सहकार्य मिळेल. प्रत्येक गावात भाजपचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून, बूथप्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली १८ संघटनात्मक कामे करेल, असेही फरांदे यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, सरचिटणीस सुनील केदार, काशीनाथ शिलेदार, ॲड. श्याम बडोदे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

The post भाजप आ. देवयानी फरांदे यांची माहिती appeared first on पुढारी.