भाविकांच्या नाका तोंडाला रुमाल, नाशिककरांची खाली मान

गोदावरी नदी www.pudhari.news

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- गोदावरी नदीला पाटबंधारे विभागाने गंगापूर धरणातून आवर्तन सोडल्यानंतर गंगापूर धरणापासून गंगा घाटापर्यंत संपूर्ण नदीपात्राला पाणवेलींनी विळखा घातल्यानंतर प्रशासन कामाला लागले. मात्र, यासाठी लावलेली यंत्रणा व कामाचा वेग पाहता, महापालिकेला याबाबत काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येते. दोन दिवसांपूर्वी बाहेर काढण्यात आलेल्या पाणवेलीदेखील उचलून घेऊन न जाता तेथेच रस्त्यावर पडलेल्या दिसत असून, त्यांची दुर्गंधी येत आहे. त्यामुळे देशभरातून आलेल्या भाविकांना नाका-तोंडाला रुमाल लावून मार्गक्रमण करावे लागत असल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. मात्र, मनपाच्या या वेळकाढूपणामुळे नाशिककरांना बाहेरून आलेल्या भाविकांसमोर खाली मान घालण्याची वेळ आली आहे.

काही दिवसांपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरीला पाणी चांगल्या प्रमाणात वाहते असून, वाहत्या पाण्याबरोबर आनंदवली ते होळकर पुलापर्यंत नदीपात्रात असलेल्या पाणवेली या रामकुंड, गांधी तलावासह इतर कुंडांच्या किनाऱ्यावर साचल्याचे बघायला मिळते. दोन ते तीन दिवसांपूर्वी महापालिकेकडून पाणवेली काढल्याचे सांगितले जात असले, तरी नदीपात्रातील अनेक कुंडांमध्ये व गोदातीरावर अजूनही पाणवेली असल्याचे दिसते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणवेली कशा आल्या, हा एक संशोधनाचा विषय आहे, तर दर तीन महिन्यांनी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या गोदावरी प्रदूषण बैठकीत कशाचा आढावा घेतला जातो, या बैठकीत काय होते, हादेखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या अधिकाराचा वापर करत महापालिकेसह नदीपात्रात प्रदूषणासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी गोदाप्रेमींकडून सातत्याने होते. मात्र, त्याचीदेखील दखल मनपाकडून घेतली जात नाही.

नदीत पाणवेली सातत्याने तयार होत आहेत व पालिकेकडून वेळावेळी यंत्राच्या साहाय्याने काढण्यातही येतात. मात्र, काही दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा जैसे थेच होते. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने महापालिकेला हस्तांतरित केलेले कोट्यवधी रुपयांचे ट्रॅश स्किमर मशीनचा उपयोग होत नसल्याने कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

वाहन, कपडे धुलाई सुरू

न्यायालयाने निर्देश देऊनही महापालिका व पोलिसांकडून प्रदूषण करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही. गोदाघाटावर नदीकिनारी कपडे व व वाहने सर्रासपणे धुतली जातात. मात्र, याकडेदेखील कानाडोळा केला जातो. त्यामुळे येथे कपडे व वाहने धुणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

कोट्यवधी रुपयांचा चुराडा, मात्र गोदेचे नशीब खुलेना

सिंहस्थ कुंभमेळानिमित्त दरवेळी कोट्यवधी रुपये मनपास प्राप्त होत असतात. मात्र, दरवेळी फक्त देखावा करण्यात येतो. नमामि गोदा प्रकल्पाचा उदो उदो गेल्या अनेक महिन्यांपासून केला जात असून, यातून नेमके काय निष्पन्न झाले, हा प्रश्न अनुत्तरित आहे. या प्रकल्पाला मूर्त स्वरूप नक्की कधी मिळेल, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

The post भाविकांच्या नाका तोंडाला रुमाल, नाशिककरांची खाली मान appeared first on पुढारी.