मतदान यंत्रणात हेराफेरीची ठाकरे गटाला भीती

EVM

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर आता मतदान यंत्रात हेराफेरी करून हातातोंडाशी आलेले यश महायुती हिरावून नेण्याची भीती ठाकरे गटाला सतावत आहे. त्यामुळेच येत्या ४ जूनला मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंबड वेअर हाउसमधील मतमोजणी केंद्र परिसरात मोबाइल, वायफाय, ब्लू टूथ व इतर सर्व फ्रीक्वेन्सी नेटवर्क बंद ठेवण्याची मागणी ठाकरे गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २०) मतदान पार पडले. त्यानंतर सर्व मतदान यंत्रे (ईव्हीएम) अंबड येथील वेअर हाउसमधील स्ट्राँगरूममध्ये आणून ठेवण्यात आली आहेत. या यंत्रांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात केली असली, तरी मतदान यंत्रांची दैनंदिन तपासणी गरजेची आहे. तसेच मतमोजणी प्रक्रिया सुरू होण्याच्या २४ तास आधी सर्व मोबाइल कंपन्याचे नेटवर्क, ब्लू ब्लु टूथ नेटवर्क किवा वायफाय नेटवर्क तसेच इतर कुठल्याही भ्रमण लहरी फ्रीक्वेन्सी त्या ठिकाणी उपलब्ध नसतील, याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी वेअर हाउस परिसरात जॅमर बसविण्याची मागणी ठाकरे गटाने यापूर्वीच केली होती. परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. ही बाब संशयास्पद असल्याचे नमूद करत ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी ठाकरे गटाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल आणण्यास प्रतिबंध होता, त्याप्रमाणे मतमोजणी केंद्रातही मतमोजणीवेळी मोबाइल आणण्यास अधिकारी, कर्मचारी, उमेदवार प्रतिनिधी व इतर सर्वांना प्रतिबंध करावा त्याशिवाय ईव्हीएम, बीयू सीयू, व्हीव्हीपॅट या यंत्रणा मतमोजणीसाठी सुरु करू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनावर ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी माहापौर विनायक पांडे, माजी आ. वसंत गिते, योगेश घोलप आदींची नावे आहेत.

हेही वाचा –