नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आणि ओबीसी आरक्षणात राज्यसरकारने ठोस भूमिका घेतली नसल्याचा फटका राज्यात महायुतीला बसला असून जागावाटप आणि उमेदवारांची निवड चुकल्याचे निकालातून दिसून आले आहे, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे.
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. राज्यातही महायुतीच्या जागा घटल्या. यासंदर्भात भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय म्हणाले भुजबळ?
- शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबाबत जनतेत सुप्त सहानुभूती होती हे मी आधीच सांगीतले होते.
- जागावाटप आणि उमेदवारांची निवड चुकल्याचे निकालातून दिसून आले आहे.
- त्यामुळे योग्य निर्णय घेतले असते तर, पराभव टाळता आला असता अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.
भाजपने आत्मचिंतन करावे
भुजबळ म्हणाले की, राज्यातील ६० टक्के ओबीसी मते भाजपला मिळणे अपेक्षित होते; परंतु, तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे भाजपने आता याबाबत आत्मचिंतन करायला हवे. अनेक गोष्टी एकत्र आल्याने हा पराभव झाला आहे. दिंडोरीत कांद्याबाबत मोठी नाराजी होती. दिंडोरीतील शेतकऱ्यांची मुले नाशिकमध्येच राहतात. लोकांमध्ये उद्रेक होता हे निकालात दिसत आहे. त्यामुळे कांद्याचा फटका नाशिक आणि दिंडोरीत बसल्याचे दिसून आल्याचे भुजबळांनी यावेळी सांगीतले. चारशे पार घोषणेचाही फटका बसला आहे. राज्यात महायुतीच्या विरोधात निकाल आहे. त्यामुळे चुका दुरूस्त कराव्या लागतील आत्मचिंतन करावे लागेल, असा सल्लाही भुजबळ यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे.
उमेदवारी जाहीर करण्यात उशीर
नाशिकसह इतर ठिकाणी उमेदवार देण्यात चूक झाली का? असे भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, हो खरे आहे. नाशिक लोकसभेसाठी अगोदर माझे नाव चर्चेत आले होते. मात्र, नावाची घोषणा लवकर न झाल्याने मी माझी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी उशीर झाल्याने मी सांगितले होते की आता लवकर कुणाचे तरी नाव जाहीर करा. मी माघार घेतल्यानंतर देखील 12, 13 दिवस उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही. त्यानंतर गोडसेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली, असे भुजबळ यांनी सांगितले.
हेही वाचा –