माझ्या भोवती शिवसेना प्रमुखांचे कवच : उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे

पुढारी ऑनलाइन डेस्क – आज माझ्याकडचे सगळे काही विरोधकांनी चोरले. माझा धनुष्यबाण चोरला. पण माझी मशाल बघा कशी पेटली आहे. संपूर्ण देशाची फौज त्यांच्याकडे असली तरी ते उद्धव ठाकरेंना घाबरत आहेत. कारण शिवसेना प्रमुखांचे कवच माझ्याभोवती असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी आज (दि.15) उद्धव ठाकरे यांची सभा येथे झाली. यावेळी त्यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला. माझा पक्ष संपल्याचे काही बोलतात, माझी काळजी करु नका. तुम्ही तुमचे पहा. माझी काळजी करण्यासाठी आई जगदंबा व आई भवानी आहे असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

कोरोना काळात जगावर मोठे संकट आले. त्यावेळी संपूर्ण देशात नंबर एकचा मुख्यमंत्री म्हणून माझे नाव होते. मला त्या गोष्टीचे समाधान आहे. पण हे माझे एकट्याचे श्रेय नाही. हे तुमचे सहकार्य आहे. मी तुम्हाला जेजे सांगत गेलो तेते तुम्ही ऐकलंत. हे माझं कर्तुत्व नाही तर माझ्या जनतेचे कौतुक आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

पाच तारखेला देशात आमचे सरकार येणार आहे. त्यानंतर ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स सगळे आमच्या हातात असेल. मग बघा, तुमच्याकडे पळालेल्या उंदरांच्या कशा शेपट्या पकडतो असा इशारा उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना दिला. गेल्या दोन वेळेला 2014, 2019 ला मोदींना मत द्या सांगायला मी आलो होतो, माझी चुक झाली. आता त्यांनी माझा घात करण्याचा प्रयत्न केल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.