मित्राला हॉस्टेलवर सोडायला गेलेल्या दोघा तरुणांचा अपघाती मृत्यू

दोघा मित्रांचा अपघाती मृत्यू,www.pudhri.news

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा– काल मध्यरात्रीच्या सुमारास भाडणे फाट्याजवळ भरधाव वेगातील पिकअप व्हॅनने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे तरूण ठार झाले. अपघातानंतर पिकअप वाहन चालक पसार झाला. याप्रकरणी साक्री शहर पोलीस ठाण्यात पिकअप व्हॅन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर रमेश भवरे(23) रा. मालुसरे सोसायटी, घोड्यामाळ, पिंपळनेर याने साक्री शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, काल रात्री भाऊ करण रमेश भवरे (21)रा.घोड्यामाळ, पिंपळनेर व त्याचा मित्र घनश्याम किशोर गांगुर्डे (19) हे दोघे त्यांच्या मित्रास साईनाथ मिटकर याची दुचाकी एम.एच.18बी.एस.0791 ने भाडणे येथील शासकीय होस्टेलवर सोडण्यासाठी गेले होते. होस्टेलवर मित्रास सोडल्यानंतर ते दोघे पिंपळनेरकडे निघाले. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ते भाडणे फाट्यावरुन जात असताना पिंपळनेरकडून साक्री शहराकडे जाणाऱ्या एम.एच.41एयु 4664 क्रमांकाच्या भरधाव वेगातील पीकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात भाऊ करण भवरे हा गंभीर जखमी होवून जागीच मरण पावला. तर घनश्याम गांगुर्डे गंभीर जखमी झाला. अपघातानंतर पीकअप वाहन चालक वाहन सोडून पसार झाला. गंभीर जखमी घनश्याम यास उपचारासाठी धुळे शहरातील शासकीय रूग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. या फिर्यादीवरून साक्री शहर पोलीस ठाण्यात पीकअप व्हॅन चालकावर मोटार वाहन कायदा कलम प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.पु ढील तपास साक्री पोलीस करीत आहेत.

अपघाताची क्लिप व्हायरल होताच कुटुंबियांची रुग्णालयात धाव

दरम्यान, करण भवरे रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या आई-वडिलांनी साक्रीपर्यंत त्याचा शोध घेतला. मात्र, त्यांना तो कुठे आढळून आला नाही. त्यानंतर ते पिंपळनेर येथील रहात्या घरी परतले. दि.21 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास व्हॉट्ॉपवर अपघाताची क्लीप व्हायरल झाल्याने करणचा अपघात झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी तात्काळ साक्री ग्रामीण रूग्णालय गाठले. तेव्हा करण हा गंभीर जखमी होवून मृत झाल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा :

The post मित्राला हॉस्टेलवर सोडायला गेलेल्या दोघा तरुणांचा अपघाती मृत्यू appeared first on पुढारी.