मुंबई -नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसचे १२ कोच वातानुकूलित केल्याने चाकरमानी नाराज

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा- मुंबई -नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस या गाडीच्या १२ स्लीपर कोच पैकी १० कोच आणि ४ जनरल कोचपैकी दोन कोच वातानुकूलित करण्यात आले आहेत. या बदलामुळे प्रवाशांना आता जास्त भाडे खर्चावे लागणार असून लासलगाव येथील प्रवाशांना या डब्ब्यांमध्ये प्रवेश करण्यासही जागा नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रविवारी (दि. २६) मे पासून लागू करण्यात आलेल्या या बदलामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. दररोज अप डाऊन करणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थी वर्गाला याचा फटका बसला असून शेकडो प्रवाशी यातून प्रवास करणार कसा ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

निफाड तालुक्यातील लासलगाव, निफाड येथील प्रवाशांची हक्काची मनमाड-मुंबई गोदावरी एक्स्प्रेस पूर्वी मनमाड येथून सुटायची. त्यामुळे या गाडीत लासलगावच्या प्रवाशांना जागा उपलब्ध हाेत होती. मात्र, आता गोदावरी एक्स्प्रेस धुळे येथून सोडण्यात येत असल्याने त्या गाडीत प्रचंड गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना या गाडीत जागाच भेटत नसल्याने त्यांनी या गाडीने प्रवास करणे टाळले. या गाडीनंतर आता नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस या गाडीचे १२ स्लीपर कोच पैकी १० कोच हे वातानुकूलित केल्याने सर्वसामान्य प्रवाशांना आता जास्तीचे भाडे खर्च करावे लागणार आहे. तर दुसरीकडे दररोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना बोगीत घुसने सुद्धा मुश्कील झाले आहे. रेल्वे प्रशासनाने फक्त उत्पन्न वाढीकडे न पहाता सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे असल्याची अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

वातानुकूलित डब्ब्याची संख्या वाढल्याने गाडीत प्रवेश करणे सुद्धा जिकरीचे झाले आहे.

-हर्षल कोचर, प्रवाशी, लासलगाव

हेही वाचा –