नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी (दि. ८) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते पंचवटीतील तपोवन मैदानाची पाहणी तसेच राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक घोषित झाल्याने प्रशासनाकडून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची वेळ बदलून दुपारी १२ वाजता केली आहे.
नाशिकमध्ये १२ ते १६ जानेवारी कालावधीत २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. देशभरातील २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांमधून ८ हजार युवक या महोत्सवात सहभागी होणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे नाशिकला येत आहेत. दुपारी अडीच वाजता ओझर विमानतळ येथे त्यांचे आगमन होईल. तेथून मुख्यमंत्री थेट तपोवनामधील मैदानाच्या पाहणीसाठी रवाना होतील. त्यानंतर ३ वाजून ४० मिनिटांनी मुख्यमंत्री बैठक घेतील. बैठकीमध्ये पंतप्रधानांच्या दाैऱ्याच्या अनुषंगाने शिंदे आढावा घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक लागल्याने पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या वेळेत बदल केला आहे. नियोजित कार्यक्रमानुसार दुपारी दोन वाजता होणारी बैठक आता दुपारी १२ ला बोलविली आहे.
हेही वाचा :
- Nashik News : कपडे धुताना अल्पवयीन गर्भवती मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू
- रोहित शर्मा 14 महिन्यांनंतर पुन्हा कर्णधार
- परभणी : न-हापूर येथे बैलांची वाहतूक करणारा टेंम्पो उलटला; दोन बैलांसह चालक जखमी
The post मुख्यमंत्री शिंदे आज नाशिकमध्ये appeared first on पुढारी.