धुळे; पुढारी वृत्तसेवा- राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपाडे यांनी डॉ. कै. दुग्गल स्मृति समिती संचलित मातोश्री वृद्धाश्रम येथे जाऊन वृद्धाश्रमातील 22 आजी आजोबांना मतदान कार्डाचे वाटप केले. तसेच नवनिर्माण समाज सेवक संघ कुष्ठरोग आश्रमासही भेट दिली.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, नायब तहसिलदार राजु सोनार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्प निदेशक तथा मास्टर ट्रेनर दिनेश सैदाणे, मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक धीरज धनगर, प्रशांत मोराणकर, कुष्ठरोग आश्रम व्यवस्थापक भरत पाठक, शैलेंद्र पाठक, सागर नेमाणे, मंडळ अधिकारी संतु शिरसाठ आदी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी देशपाडे यांनी यावेळी मातोश्री वृद्धाश्रम, कुष्ठरोग आश्रमातील आजी, आजोबांशी चर्चा केली तसेच आगामी निवडणूकीसाठी मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले. यावेळी त्यांच्या हस्ते मास्टर ट्रेनर दिनेश सैंदाणे यांच्या मतदान जनजागृतीच्या अतिउत्कृष्ठ कामाची दखल घेऊन चांगल्याप्रकारे काम केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच 18 वर्ष पुर्ण करणाऱ्या नवमतदारांची मतदार नोंदणी व वंचितघटकांची नावनोंदणी करण्यासाठी विशेष नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत शाळा, कॉलेज, महाविद्यालय, महिला, दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक, घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीमधील व्यक्तीं, तृतीयपंथीय व्यक्ती आणि देहविक्री करणाऱ्या महिला, दुर्धर आजारग्रस्त नागरिक, व इतर वंचित घटक यांची विशेष करुन नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार उप जिल्हा निवडणूक अधिकारी, धुळे शहर अपर तहसिलदार, तहसिल कार्यालय, धुळे यांच्यामार्फत मास्टर ट्रेनर दिनेश सैदाणे यांनी शासकीय कार्यालय, शाळा, कॉलेज, महाविद्यालय, दुर्धर आजारग्रस्त, दिव्यांग, तृतीयपंथीय, कुष्ठरोग आश्रम, वृद्धाश्रमात जाऊन मतदार जनजागृती शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरात 30 हजार मतदान कार्ड काढण्यात आली. त्यापैकी 44 मतदान कार्ड हे वृद्धाश्रम व आश्रमात काढण्यात आल्याची माहिती सैंदाणे यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- Nashik News : माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर
- झारखंडचे मुख्यमंत्री साेरेन यांची ‘ईडी’ अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार
- मनोज जरांगे यांचं राजकीय आरक्षणाबाबत सूचक भाष्य
The post मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची मातोश्री वृद्धाश्रम व कुष्ठरोग आश्रमास भेट appeared first on पुढारी.