मोठी बातमी ! संदिप गुळवे यांचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश, नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी निश्चित

सिडको : पुढारी वृत्तसेवा- कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी ॲड. संदिप गुळवे यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघातून गुळवेंनाच उमेदवारी निश्चित असल्याचे समजते. यावेळी गुळवे उत्तर महाराष्ट्रातील शिक्षकांचे नेतृत्व करतील असा विश्वास शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

आज शनिवार दि.1 मुंबईत शिवसेना भवन येथे शिवसेना ठाकरे गटात त्यांचा प्रवेश सोहळा झाला. प्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते अनंत गिते, सुभाष देसाई, अरविंद सावंत, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, शिक्षक सेना नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय चव्हाण, माजी आमदार योगेश घोलप उपस्थित होते.

या वेळी ॲड. संदिप गुळवे सह शिक्षक संघटनांचे पदाधिकारी जेष्ठ शिक्षक नेते शिवाजी निरगुडे, टिडीएफ अध्यक्ष रविद्र मोरे, सि.पी.कुशारे, भरत भामरे, एनडीएसटी सोसायटीचे माजी अध्यक्ष व संचालक अरुण पवार, दत्तात्रय आदिक, बाळासाहेब देवरे, किशोर जाधव, भाऊसाहेब शिरसाट आदींनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. या वेळी खा. राऊत म्हणाले की, नाशिक शिक्षक मतदार संघात मागील निवडणुकीत शिवसेना ताकदीवर आपला उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदार संघावर शिवसेनेचा अधिकार आहे. या निवडणुकीत आपलाच म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे.

गुळवे नाशिकचे नेतृत्व करतील -संजय राऊत

महाविकास आघाडी च्या जागा दोन दिवसात जाहीर होणार आहे. तर गुळवे उत्तर महाराष्ट्रातील शिक्षकांचे नेतृत्व करतील असा विश्वास खा. राऊत यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले तर आभार शिक्षक सेना नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी मानले.

हेही वाचा –