मोबाइल चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

मोबाईल चोर गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवाशहरातून मोबाइल, लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश राज्यांमधील तिघा संशयितांना पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून २ लाख ३८ हजार २०० रुपयांचे २२ मोबाइल जप्त केले आहेत.

पंचवटीतील राजपाल कॉलनी येथील तेजश्री अपार्टमेंट येथे बुधवारी(दि.५) सकाळी सातच्या सुमारास एकाच फ्लॅटमधून चोरट्याने ५ मोबाइल चोरले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट एकचे उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली. आंध्रप्रदेश व तामिळनाडूमधील संशयित चोरटे शहरात असून ते देवळाली गाव परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. त्यानुसार चोरीचे मोबाइल विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितांना सुभाष रोडवरील वाघचौक परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांनी पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोबाइल चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पंचवटी पोलिसांनी तिघांचाही ताबा घेतला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, हवालदार प्रविण वाघमारे, विशाल काठे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, शरद सोनवणे, नाझीम पठाण आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

यांना केली अटक

पोलिसांनी संशयित इंद्रा डुमप्पा व व दुर्गेश कृष्णमूर्ती (दोघे रा. जि. चित्तुर, राज्य आंध्रप्रदेश), बालाजी सुब्रमनी (रा. जि. त्रिपथुर, राज्य तामिळनाडू) यांना पकडले आहे. त्यांच्याकडून चोरीचे २२ मोबाइल जप्त केले आहेत.

हेही वाचा –