नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. ९) दिवसभरात शहरात दोन लाचखोरांना लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यात जिल्हा न्यायालयात दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरचे सहायक अधीक्षक मनोज दत्तात्रय मंडाले यांना, तर जिल्हा परिषदेचे सुरगाणा उपविभाग उपअभियंता नंदलाल विक्रम सोनवणे (५५, रा. मुंबईनाका) अशी पकडलेल्या संशयित लाचखोरांची नावे आहेत. दोघांनाही शनिवार (दि. ११)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
न्यायालयीन दाव्यातील कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार वकिलाकडून ५०० रुपयांची लाच घेताना सहायक अधीक्षक मनोज मंडाले यास गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांच्या घरझडतीत विभागास आक्षेपार्ह काही आढळून आले नाही. तर दुसऱ्या घटनेत सुरगाणा तालुक्यातील दोन गावांचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविल्यानंतर एकूण बिलाच्या २ टक्के याप्रमाणे ठेकेदाराकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नंदलाल सोनवणे यांना त्यांच्या राहत्या घरात रंगेहाथ पकडले. सोनवणे यांच्या घरझडतीत काही मालमत्तांचे कागदपत्रे आढळून आली आहेत. ती विभागाने जप्त केली आहेत. तसे सोनवणे हे नुकतेच मुंबई नाका येथील नव्या घरात स्थलांतरित झाल्याने इतर मालमत्तांचा तपास झालेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवार-रविवारी शासकीय सुटी असल्याने सोमवारी बँक खाती व इतर मालमत्तांचा शोध घेतला जाणार असल्याचे विभागाने सांगितले. दरम्यान, शुक्रवारी मंडाले व सोनवणे यांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने दोघांनाही शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गर्गेंचा मोबाइल स्विच ऑफ
आशेवाडी किल्ल्याजवळील जागेत कंपनी सुरू करण्यासाठी ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच घेताना राज्य पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचे नाशिक येथील पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालक संशयित आरती मृणाल आळे (४१, रा. अनमोल नयनतारा, राणेनगर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. ७) रंगेहाथ पकडले. तर विभागाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे यांनी लाचेच्या रकमेतून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिल्याचे उघड झाले. याप्रकरणी दोघांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून गर्गे फरार असल्याचे विभागाने सांगितले. तसेच त्यांचा मोबाइलही स्विच ऑफ असल्याने त्यांचा तपास करण्यात अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा –