नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
आरएसएस, कट्टरपंथी लोक देशात द्वेष पसरवत आहेत. भावाला भावाशी, एका राज्याला दुसऱ्या राज्याशी, समाजा-समाजात व धर्मा- धर्मात एकमेकांना लढवत आहेत. या गोष्टी माध्यमांमध्ये येत नाहीत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान संपवायला निघाले आहेत. कोणी कितीही प्रयत्न केला, तरी संविधान संपवू शकत नाहीत, असा घणाघात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केला.
भारत जोडो न्याय यात्रा धुळेमार्गे बुधवारी (दि. १३) मालेगावी दाखल झाली. रोड शो दरम्यान सुपर मार्केटजवळील चौकात यात्रेचे रूपांतर सभेत झाले. ते नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार बाळासाहेब थोरात, कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष एजाज बेग, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, राजेंद्र भोसले, विनोद चव्हाण, अजय शाह, निखील पवार आदी उपस्थित होते.
खा. गांधी म्हणाले, देशातील ७० कोटी लोकांकडे जितका पैसा आहे. तेवढाच पैसा फक्त २२ लोकांकडे आहे. तरीही सरकारने या कोट्यधीशांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले. २४ वर्षांचा मनरेगाचा पैसा मोदी यांनी या उद्योगपतींचे कर्ज माफ करून नष्ट केला. सरकार अरबपतींचे कर्ज माफ करते, मात्र शेतकरी, शेतमजूर, महिला यांचे कर्ज माफ करत नाही. हा खऱ्या अथनि आर्थिक अन्याय आहे. देशात बेरोजगारी, महागाई व भागीदारी हे खरे प्रश्न आहेत. याकडे मोदी सरकार लक्ष द्यायला तयार नाही. त्यातच त्यांनी नोटबंदी व जीएसटी लागू केल्यानंतर देशातील रोजगार देणारे लहान-मोठे उद्योगधंदे बंद पडले. याला मोदी व उद्योगपती अदानी जबाबदार असल्याचा आरोप खा. गांधी यांनी यावेळी केला. या देशातील मोजकेच लोक मीडिया चालवत आहेत. हे लोक शेतकऱ्यांची समस्या दाखवत नाहीत. उद्योगपतींच्या झालेल्या कर्जमाफीबद्दल बोलत नाहीत. तर २४ तास पंतप्रधान मोदी यांचा चेहरा दाखवतात, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. देशात विकासासाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली जाते. मात्र, लाभाची भागीदारी देण्यासाठी शेतकऱ्याला उभे केले जात नसल्याचेही ते म्हणाले
या केल्या घोषणा
देशात यूपीए सरकार सत्तेवर आल्यानंतर ३० लाख सरकारी जागा भरणार, पहिली नोकरी पक्की अंतर्गत पदवीधर बेरोजगारांना खासगी व सरकारी विभागात एका वर्षाची नोकरी, जे पेपर लीक होतात ते बंद करून त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल. वाहनचालक, डिलिव्हरी बॉय यांना पेन्शन देणार, देशातील गरीब महिलांच्या बँक खात्यात वर्षाला एक लाख रुपये टाकणार तसेच गोरगरिबांचे कर्ज माफ करणार असल्याची घोषणा खा. राहुल गांधी यांनी केली.
नागरिकांशी साधला संवाद
खा. गांधींचे आगमन दुपारी ३ दरम्यान झोडगे येथे झाले. या दरम्यान सुपर मार्केटजवळ त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर शिवतीर्थ, मोसमपूल, मोतीबाग नाकामार्गे त्यांचा ताफा सौंदाण्याकडे मार्गस्थ झाला.
मालेगाव रॅली रोड शो चे पहा फोटो….
The post राहुल गांधींचा घणाघात; कोणी कितीही प्रयत्न केला तरी संविधान संपवू शकत नाही appeared first on पुढारी.