नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सातपूर औद्योगिक वसाहतीतील बाबासाई बेकरी येथे लिफ्टच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी करत असताना लिफ्ट उंचावरून कोसळल्याची घटना शुक्रवारी (दि.१) झाली होती. यात एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात लिफ्टच्या देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाई बेकरी येथे कंपनी चालकांनी कामाच्या सोयीसाठी बाहेरून लिफ्ट उभारली. लिफ्टचे काम कसे झाले याची चाचणी करण्यासाठी बेकरी संचालकाचे नातलग कुणाल सी. मोटवारी (३२), लिफ्टचे व बेकरीत काम करणारे शाहरुख खान, कमलेश चंद्रवंशी, दिनेश बैठ असे चौघे शुक्रवारी (दि.१) सायंकाळी ४.३० च्या सुमारास लिफ्टमध्ये बसले. सुमारे २५ फुट वर गेल्यानंतर लिफ्ट अचानक कोसळली. त्यात गंभीर मार लागल्याने कुणाल यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पवन टी. चंदवाणी (३९, रा. त्र्यंबकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, लिफ्टचे काम करण्याची जबाबदारी असलेल्या ऋषिकेष इंजिनिअरींग कंपनीने कामात निष्काळजीपणा केला. त्यामुळे चाचणी घेताना लिफ्ट वर गेल्यावर बेरींग निसटले व लिफ्ट कोसळून कुणाल यांचा मृत्यू झाला. त्यामुळे देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीचे मालक राहुल चोपडे यांच्याविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने 45 लाखांची फसवणूक
- भिवंडीत 16 लाखांचा 37 किलो गांजा जप्त
- स्वच्छतागृहाअभावी महिलांची कुचंबणा; मंदिराजवळील स्वच्छतागृह अर्धवट अवस्थेत
The post लिफ्ट कोसळल्याने एकाचा मृत्यू ; कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.